| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
फाल्गुन महिन्याच्या आगमनासोबतच कोकण पट्ट्यात शिमगोत्सवाची लगबग सुरू झाली असून गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. होळीच्या सुमारे 15 ते 20 दिवस आधीपासूनच सणाची चाहूल लागते. महिलांकडून ग्रामदेवतेसाठी पारंपरिक ओव्या, भारुडे आणि भक्तिगीते गात प्रार्थना केली जाते. या गायनातून गावाच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले जाते. फाल्गुन पंचमीपासून शिमगो उत्सवाला औपचारिक सुरुवात होते. पंचमीच्या दिवशी पहिली होळी प्रज्वलित केली जाते. त्यानंतर गावातील ‘खेळे’ खास पारंपरिक वेशभूषेत सजून घराघरांत जाऊन सादरीकरण करतात. डोक्यावर फेटे, गळ्यात फुलांच्या माळा, हातात पारंपरिक वाद्ये आणि चेहऱ्यावर रंगीबेरंगी रंग अशी त्यांची वेशभूषा आकर्षण ठरते. विशेष म्हणजे हे खेळ अनवाणी सादर करण्याची परंपरा आजही काटेकोरपणे पाळली जाते.
होळीपूर्वी चार ते पाच दिवस खेळांची गावात वर्दळ असते. प्रत्येक घरासमोर ढोल, ताशा, मृदुंग आणि झांजांच्या तालावर पारंपरिक नृत्ये सादर केली जातात. शेजारील गावांमध्येही खेळांची देवाणघेवाण होत असल्याने परिसरात सांस्कृतिक ऐक्याची भावना दृढ होत आहे. होळीच्या दिवशी विधिवत पूजन करून नवस फेडले जातात. दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी मोठ्या भक्तिभावाने काढण्यात येते. देवाची पालखी गावागावांत फिरवली जाते. गावकरी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत ‘ग्रामदेवतेच्या’ जयघोषात पालखीचे स्वागत करतात. प्रत्येक वाडी-वस्तीत पालखी नेऊन आरती, पूजा व नैवेद्य अर्पण केला जातो. घराघरांतून फुलांची उधळण करत देवाचे आशीर्वाद घेतले जातात. दरम्यान, शिमगोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील साखरी गावातून निघालेली ग्रामदैवताची पालखी मोठ्या भक्तिभावात श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे दाखल झाली. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि जयघोषात पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.







