बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरू; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| चौल | प्रतिनिधी |
सर्वाधिक वर्दळ असलेला पाल्हे बायपासवरील पाल्हे पूल कमकुवत झाला असून, मागील महिन्यात पुलाच्या बाजूचा काही भाग खचला होता. यामुळे पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. याबाबतचे सूचना फलक लावण्याने आले असले तरी अजूनही अवजड वाहतूक सुरू आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पाल्हे पूल कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील सहाण बायपास मार्गे नागाव, रेवदंडा, मुरुड आदी ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या रस्त्यावरील पाल्हे पूल कमकुवत झाला असून, या पुलावरुन अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील महिन्यातच पुलाच्या बाजूचा काही भाग कोसळला होता. याबाबत नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर आणि ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ही गोष्ट लक्षात आणून देत तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु, पुलाचा स्लॅब, पीलरचे दगड निखळून पूल अवजड वाहतुकीसाठी कमकुवत असल्याने सा.बां. विभागाकडून पाल्हे बायपायसच्या दोन्ही टोकाला आणि पुलावर ‘अवजड वाहतुकीसाठी पुलावरुन बंदी’ अशा प्रकारचा सूचना फलक लावण्यात आला आहे. परंतु, तरीसुद्धा सर्रासपणे अवजड वाहतूक सुरू आहे. दरम्यान, पुलाला मोठे हादरे बसत असून, पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जनतेत संताप
दरवेळी पावसाळा सुरू झाला की पुलाच्या दुरुस्तीचा विषय समोर येतो. मात्र, आतापर्यंत कित्येक वर्षे पुलाखालून पाणी वाहून गेले आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल दुरुस्तीचा गंभीर विषय का हाती घेतला नाही, असा प्रश्न आता जनमानसातून विचारला जात आहे. दरवेळी सूचना फलक लावून आपल्या जबाबदारीतून मोकळे व्हायचे, असे अजून किती वर्षे चालणार?