पनवेल – इंदापूर चौपदरीकरणाचे काम मे अखेरपर्यंत होणार

रायगडकरांना आणखी सहा महिने सुकर रस्त्याची प्रतिक्षा


| अलिबाग | प्रमोद जाधव |

पनवेल ते इंदापूर या लांबीतील चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मे 2024 अखेरपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना या रस्त्यासाठी आणखी सहा महिने वाट पहावी लागणार आहे. पनवेल ते इंदापूर या 84.6 किलो मीटर चौपदरीकरणाचे काम खासगीकरणांतर्गत बीओटी तत्वावर मेसर्स सुप्रिम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा. लि. कंपनीला दिले होते. मुदतीत काम पूर्ण न केल्याने या कंपनीला 37 अंतर्गत 17 नोव्हेंबर 2021 रोजी बाद केले होते. या कंपनीने या कारवाईला आव्हान देत दिल्ली येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. लवादाने कंपनीचा हा दावा रद्द केला. त्यानंतर दिल्ली येथील उच्च न्यायालयाने दावा रद्द केला. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प. का. ई पनवेल यांच्या मार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले.

पनवेल ते कासू 42.3 किलो मीटर व कासू ते इंदापूर 42.3 किलो मीटर या दोन टप्प्यात काम सुरु करण्यात आले. पनवेल ते कासू या पहिल्या टप्प्यातील काम सुरु करण्यात आले. हे काम प्रगती पथावर आहे. पनवेल ते इंदापूरच्या डाव्या बाजूकडील 37.90 किलो मीटर वव उजव्या बाजूकडील 14.70 किलो मीटरच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 31 मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे जवळपास 23.67 किलो मीटर काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चौपदरीकरणाचे काम मेसर्स कल्याण टोल इन्फ्रा लि कंपनीला 18 नोव्हेंबर 2022 मध्ये देण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे रस्ते खराब होण्याचा धोका असल्याने ज्या ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. त्या ठिकाणी काँँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत 25 किलो मीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम 21 मे पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु होऊन एक तप पूर्ण झाले आहे. या रखडलेल्या महामार्गाच्या कामासाठी वेगवेगळ्या संस्था, संघटनांबरोबरच पत्रकारांनीदेखील आवाज उठविला. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढले, निवेदन देऊन महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र आजही चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यास संबंधित विभाग उदासीन ठरत आहेत. या संथगतीने सुरु असलेल्या कामांमुळे पर्यटकांसह नागरिक व जिल्ह्यातील स्थानिक त्रस्त झाली आहेत. आता मेअखेरपर्यंत काम पूर्ण होणार असल्याने रायगडकरांना अजून सहा महिने वाट पहावी लागणार आहे.

23 महिन्यात 129 जणांचा मृत्यू
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या ठिकाणी 23 महिन्यांमध्ये 129 जणांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. 2022 मध्ये 58 व नोव्हेंबर 2023 पर्यंत 71 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेकडून प्राप्त झाली आहे. महामार्गावरील रखडलेले काम, रस्त्यावर पडलेले खड्डे, अतिवेगात वाहन चालविणे अशा अनेक कारणांमुळे हे अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये 343 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले असल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version