पनवेलकरांची ‘एक हाक प्रवाशांसाठी’; आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

। पनवेल । प्रतिनिधी ।
‘एक हाक प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे म्हणत पनवेल प्रवासी संघाने एसटी स्थानकातील संकुलाच्या रखडलेल्या कामास त्वरित सुरुवात करावी या मुख्य मागणीसाठी गुरुवार (दि.3) लाक्षणिक धरणे आंदोलन केले. प्रवासी, सेवाभावी संघटना, आणि बहुतांश राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात हिरीरीने सहभागी होऊन एसटी स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी आग्रही मागणी केली.

भरघोस प्रतिसाद लाभलेल्या आंदोलनाची दखल घेत एसटी प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंते व विभागीय अभियंते यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि आगामी 15 दिवसात प्रकल्पास प्रारंभ करण्यासंदर्भात प्रशासनासोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. तर आगामी तीस दिवसात प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्यास आंदोलनाची धार तीव्र करणार असल्याचे पनवेल प्रवासी संघाच्या वतीने सांगण्यात आले.

पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या देखरेखीखाली आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, सचिव श्रीकांत बापट, निलेश जोशी हे आंदोलन स्थळी धरणे देण्यासाठी स्थानापन्न झाले होते.

आ.बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना नेते बबन पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, शिवसेनेचे शिरीष घरत, शेकाप नेते काशिनाथ पाटील, गणेश कडू, राजेश केणी,काँग्रेसचे मल्लिनाथ गायकवाड, नंदराज मुंगाजी,कृऊबा सभापती दत्तात्रय पाटील, मोहन कडू, नगरसेवक रवींद्र भगत, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंग, शिरीष बुटाला, प्रवीण जाधव, श्रुती म्हात्रे, सुनील मोहोड,विश्‍वास पेटकर, अमित लोखंडे,आदी राजकीय प्रभूतींनी आंदोलनाला पाठिंबा दिला. सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या सामाजिक संस्थांनी देखील पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद दिला. कुमार दवे यांनी प्रास्ताविक केले

एसटी प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता विजय रेडेकर, विभागीय अभियंता विजय सावंत यांनी आंदोलन स्थळी येऊन पुढील पंधरा दिवसात स्थानक संकुल उभारणी बाबत प्रवासी संघ आणि एसटी प्रशासन यांच्या दरम्यान बैठक घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.

आठ दिवसाचा वेळ घ्या आणि याबाबतीतील वस्तुस्थिती तपासून त्याबाबतची माहिती आमच्यापर्यंत सादर करा. 19 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होत आहे जे करणार असाल तेच बोला आणि जबाबदारीने बोला, इथे आश्‍वासनं देऊन ती पूर्ण न केल्यास तुमच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. आंदोलनाची दखल मी येत्या अधिवेशनात घेणार आहे. चर्चेच्या माध्यमातून आणि वैधानिक पातळीवर दोन्ही बाजूचा वापर करीत तातडीने मार्गस्थ व्हावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे.

आ.बाळाराम पाटील

14 वर्षे अनेक समस्या झेलत ते बिचारे प्रवास करत आहेत. स्थानक संकुल पूर्ण होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील. आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या हाकेला भरघोस प्रतिसाद देत आमचे मनोबल वाढविणार्‍या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

अभिजीत पाटील, कार्याध्यक्ष, पनवेल प्रवासी संघ

Exit mobile version