पनवेल रेल्वे प्रशासनाने स्थानकातील भुयारी मार्ग केला पुन्हा सुरू 

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल रेल्वे स्थानकात सकाळी व संध्याकाळी चाकरमान्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पनवेलकडे जाण्यासाठी एकाच उड्डाणपुलावर अवलंबून राहावे लागत असल्याने संभाव्य अनुचित प्रसंग टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अखेर स्थानकातील भुयारी मार्ग पुन्हा सुरू केला आहे.

या निर्णयामुळे नवीन पनवेलकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला असून, प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्षात भुयारी मार्गातून मोठ्या प्रमाणावर सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जड बॅगा, ट्रॉली तसेच अपुऱ्या सुविधांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. स्थानकात लिफ्ट, रॅम्प किंवा स्वतंत्र व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवाशांचे विशेष हाल होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी आवश्यक सुविधा नसल्याने हा निर्णय अर्धवट ठरत असल्याची भावना प्रवासी व्यक्त करत आहेत. इतकी वर्षे हा त्रास सहन करायचा का, असा संतप्त सवाल आता प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जात असून, या गंभीर समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा प्रश्न पनवेलकर विचारत आहेत.

Exit mobile version