। पनवेल । वार्ताहर ।
एका 3 वर्षीय लहान अपंग मुलीला तिच्या पालकांनी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्र. 3 वर कर्तव्यावर असणाऱ्या पुरुष होमगार्डला एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्याने तात्काळ जाऊन पाहणी केली असता अंदाजे 3 ते 4 वर्षीय गहूवर्ण रंगीय तसेच अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट व ,ब्राऊन रंगाची फुल नाईट पॅन्ट घातलेली लहान मुलगी विनापालक रडत असताना मिळून आली. या मुलीच्या पालकांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. या मुलीला विचारपूस केली असता तिने फक्त तिचे नाव शिवानी एवढेच सांगितले. त्यानंतर त्या होमगार्डने मुलीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही द्वारे या घटनेची पाहणी केली असता तिच्या पालकाने बालकाची देखभाल, सांभाळ करणे गरजेचे आहे हे माहिती असताना देखील त्या लहान मुलीचा संपुर्णतः परित्याग करून तिला उघड्यावर टाकून सोडून निघून गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपी व्यक्तीबाबत कोणास काही माहीती मिळताच पनवेल रेल्वे पोलीस ठाणे दुरध्वनी क्रं. 02227467122, 9821425404 किंवा महिला पोलीस हवालदार एस.एस. बोराटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.






