फलाट नसलेल्या मार्गावर पॅसेंजर थांबली

सखोल चौकशीची मागणी
| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल स्थानकात सकाळी साडे नऊच्या सुमारास दिवा-रोहा गाडी पकडताना मोठी दुर्घटना टळली आहे. यावेळी पनवेल स्थानकात निर्माण झालेल्या गोंधळाला नेमके जबाबदार कोण आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने पनवेल रेल्वे स्थानकात फलाट नसलेल्या मार्गावर दिवा-रोहा पॅसेंजर गाडी थांबवल्याप्रकरणी मध्य रेल्वेने समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांनी मध्य रेल्वे जनरल मॅनेजर,भारत सरकार यांच्याकडे केली आहे.

स्थानकात दररोज लांबपल्ल्याच्या गाड्यांची मोठी वर्दळ असते. त्यातच रोज सकाळी गाडी पकडण्यासाठी स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी येजा करीत असतात. शनिवारी सकाळी दिवा-रोहा या गाडीने अचानक ट्रॅक बदलल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आणि गाडी पकडण्याच्या नादात प्रवाशांनी जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळ ओलांडला. या घटनेमुळे निर्माण झालेल्या गोंधळाला जबाबदार कोण? ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे रेल्वे प्रशासनाकडून गोंधळ होतोच कसा? असा सवाल करीत पाटील यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी यांना लेखी पत्र देखील पाठवले आहे.

रेल्वेकडून गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार याची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे नियमित याच प्लॅटफॉर्मवर गाडी येणार असा अंदाज प्रवाशांनी बांधून ते रेल्वेची वाट पाहत होते. यामध्ये ज्येेष्ठ नागरिक, महिला, बालक व अपंगांचा समावेश असल्याने रेल्वे प्लॅटफॉर्म नसलेल्या ठिकाणी थांबविल्याने प्रवाशांनी गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मखालील रुळ ओलांडण्यासाठी एकच पळापळ केली. या दरम्यान इतर कोणतीही जलद रेल्वेगाडी न आल्याने जरी मोठा अनर्थ टळला असला तरीही याबाबत नेमकी चूक कोणाची झाली, याविषयी स्थानिक प्रबंधकांनी कोणतीही माहिती प्रवाशांना दिली नसल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

स्थानकात घडलेल्या गंभीर प्रकरणाची माहिती देऊन मध्य रेल्वेने तात्काळ एक समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-अभिजित पाटील, मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य

Exit mobile version