22 डिसेंबर रोजी भिवंडीतून निघणार
| कर्जत | प्रतिनिधी |
लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले जात नाही. त्यामुळे चार जिल्ह्यातील भूमिपुत्र एकवटले असून, 22 डिसेंबर पासून ‘दिबा’ पायी दिंडी भिवंडी येथून निघून नवी मुंबई विमानतळ येथे धडक देणार आहे. आक्रोश दिंडीचे समन्वयक निलेश पाटील यांनी डोंबिवली येथील सभेत या पायी दिंडीचा मार्ग जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांसाठी जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा ऐतिहासिक निर्णय माजी खासदार व राज्य विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते दि.बा. पाटील यांच्या माध्यमातून राज्यसरकारने घेतला होता. तर, राज्यात स्त्री-भ्रूण हत्या आणि कुळ कायदा बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे त्यांचे योगदान नवीन मुंबई शहराच्या उभारणीत आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेली दहा वर्षे केली जात आहे. या मागणीच्या निमित्ताने राज्य सरकारने आपला ठराव केंद्र सरकारला दिला आहे. तसेच, त्यासाठी अनेक आंदोलने उभी राहिली आहेत. परंतु, केंद्र सरकार कडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यातच या विमानतळावरून चालू महिन्यात उड्डाण सुरू होणार असल्याने भूमिपुत्र अधिक आक्रमक झाला आहे. या भूमिपुत्रांकडून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली असून, आता हे आंदोलन खासदार सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा यांनी हातात घेतले आहे. त्यानुसार कार रॅलीनंतर आता आरपारची लढाई लढली जात असून खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली ‘दिबा पायी दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी भिवंडी येथील मानकोली नाक्यापासुन ठाणे त्यानंतर ऐरोलीवरून ठाणे-पनवेल राष्ट्रीय महामार्गाने नवी मुंबई विमानतळ येथे धडक देणार आहे.
या रॅलीचे मार्गाबाबत आक्रोश रॅलीचे समन्वयक आणि नवी मुंबई आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी डोंबिवली येथील सभेत याबाबत माहिती दिली. भिवंडीचे मानकोली नाका येथून सोमवारी (दि.22) सकाळी पायी दिंडी मार्गस्थ होणार आहे. त्यात सुरुवातीला किमान 25 हजार भूमिपुत्र सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही दिंडी दुपारच्या वेळेस खारेगाव-ठाणे येथे विसावा घेईल. त्यानंतर ही पायी दिंडी ठाणे शहरातून सायंकाळी 15 किलोमीटर अंतर पार करून ऐरोली येथे मुक्कामासाठी थांबणार आहे. दिंडीत चालणाऱ्या महिलांना सायंकाळी आपल्या घरी पोहचता यावे यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पायी दिंडी मंगळवारी (दि.23) सकाळी ऐरोली येथून सुरू होईल आणि पुढे दुपारी 15 किलोमीटर अंतर पार करून सीबीडी येथे मुक्काम करेल. तर, अंतिम पडाव पार करण्यासाठी बुधवारी (दि.24) रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्ह्यातील भूमिपुत्र हे हजारांचे संख्येने या दिंडी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर नवी मुंबईमधील दोन दिवसांच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था नवी मुंबई भूमिपुत्र यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे खासदार सुरेश म्हात्रे आणि समाजातील आजी-माजी पदाधिकारी हे देखील या पायी दिंडीत चालणार आहेत.
सरकारकडून निर्णयाची अपेक्षा
राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून मागील दोन वर्षांपासून कोणत्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे भूमिपुत्र लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आक्रमक झाला आहे. आगामी काळात महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्या निवडणुकीच्या मतांवर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







