। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय संघावर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत 25 धावांवर पराभूत व्हावे लागल्याने व्हाईटवॉशची नामुष्की ओढावली होती. न्यूझीलंड पहिलाच असा संघ ठरला आहे ज्यांनी भारताला मायदेशात 3-0 अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केले. दरम्यान, या लाजीरवाण्या पराभवामुळे भारताचे दुहेरी नुकसान झाले आहे. भारताने मालिका गमावण्याबरोबरच जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 स्पर्धेच्या गुणतालीकेतील अव्वल स्थानही गमावले आहे. यामुळे आता भारतीय संघासाठी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात सलग तिसर्यांदा प्रवेश करण्याचा मार्ग कठीण झाला आहे.
भारतीय संघ सध्या 58.33 सरासरीसह दुसर्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया सध्या 62.50 च्या सरासरीसह अव्वल क्रमांकावर आहे. तिसर्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंका संघाचे 55.56 सरासरी आहे. न्यूझीलंड भारताविरूद्धच्या विजयामुळे 54.55 सरासरीसह चौथ्या क्रमांकावर आहेत, तर पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून त्यांची सरासरी 54.17 आहे. यामुळे सध्या पहिल्या दोन क्रमांकासाठी हे पाच संघ शर्यतीत आहे.
भारतीय संघभारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे, परंतु त्यांची आता 2023-25 मधील एकच मालिका उरली आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यामुळे भारतीय संघ जास्तीत जास्त 69.23 सरासरीपर्यंत पोहचू शकतो. दरम्यान, जर भारताने आता ऑस्ट्रेलियाला 4-0 अशा फरकाने पराभूत केले, तरच त्यांना थेट अंतिम सामन्यात पोहचता येणार आहे. पण असे झाले नाही, तर त्यांना दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांच्या उर्वरित मालिकांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.