मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकणारच नाही
मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईचे ट्रॅफिक हा कायमच चर्चेचा विषय असतो. मुंबईतील चाकमान्यांना रोजच ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यावरून अनेकदा राजकीय आरोप प्रत्योरप देखील होत असतात. त्यातच आता आयपीएलचे जास्तीजास्त सामने हे मुंबईत होणार आहेत. त्यामुळे त्यांनाही सराव किंवा सामन्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅफिकचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. मात्र महाराष्ट्र सरकारने भारतीय क्रिकेट बोर्डाला आश्वासन दिले आहे की त्यांची आयपीएल ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसणार नाही. कारण राज्य सरकार आयपीएलच्या संघांना हॉटेलपासून मैदानापर्यंत जाण्यासाठी एक विशेष मार्गाची सोय करणार आहे.
येत्या 26 मार्चला वानखेडे स्टेडियमवर मुंबई – कोलकाता सामन्याने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरूवात होणार आहे. याचबरोबर ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम येथे आयपीएलचे साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबईत 55 तर पुण्यात 15 आयपीएल सामने खेळवण्यात येणार आहेत. याचबरोबर संघाना सरावासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संघाची हॉटेल्स सामन्याचे आणि सरावाचे ठिकाण यातील अंतर पाहता महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आयपीएल संघांसाठी एक विशेष रोड कॉरिडोर देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच गव्हर्निंग काऊन्सिल मिलिंद नार्वेकर यांनी बीसीसीआयच्या पदाधिकार्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यानंतर नार्वेकर यांनी सांगितले की, मआयपीएल महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला सर्व सहकार्य करणार आहे. आयपीएल सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्याबाबतचा अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.फ
बैठकीत ठाकरेंनी बीसीसीआयचे अंतरिम सीईओ हेमंग अमिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी एमसीएचे काऊन्सील मेंबर अजिंक्य नाईक देखील उपस्थित होते. यावेळी बीसीसीआयला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे याची माहिती घेण्यात आली. अशी माहिती देखील मिळत आहे की महाराष्ट्र सरकार आयपीएल सामन्यावेळी मैदानात प्रेक्षकांच्या 25 टक्के उपस्थितीला परवानगी देण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने दहा संघाच्या राहण्यासाठी दोन संघात एक फाईव्ह स्टार हॉटेल अशी सोय करण्याची शक्यता आहे.