अग्निशमनची माणगावकरांना प्रतीक्षाच

दोन वर्षानंतरही नगरपंचायतीकडे वाहन नाही, नागरिकात नाराजी
| माणगाव । वार्ताहर ।

गेली दोन वर्षापासून अग्निशमनची माणगावकर या वाहनाची प्रतीक्षा करीत असून अद्याप पर्यत हे वाहन नगरपंचायतीकडे आले नसल्याने नागरिकात नाराजीचा सूर पसरला आहे.

हे वाहन नुसते आग विझविण्यापुरते मर्यादित नाही. तर ते अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह विविध घटना घडल्यास अशा नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी दोन हात पुढे करण्यासाठी सरसावणार आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक सुसज्य अग्निशमन नुसती माणगावकरांची शान नव्हे तर नागरिकांच्या अभिमानाची बाब आहे.

जिल्ह्यात पहिले सर्व सोयीनियुक्त अत्याधुनिक सुसज्य अग्निशमन वाहन नगरपंचायतीला मंजूर असून हे वाहन बनवण्याचे काम एका ठेकेदारामार्फत सुरु आहे. तीन कोटी 17 लाख 81 हजार रुपये येवढा खर्च आला आहे. त्यासाठी उभारावे लागणारे या वाहनासाठी नगरपंचायतीला अग्निशमन केंद्र पुरेशा जागेत सर्वसोयीनीयुक्त उभारावे लागणार आहे.

त्याचबरोबर नगरपंचायतीच्या लोकसंख्येनुसार अग्निशमन सेवा बळकटीकरणाच्या योजनेनुसार अधिकारी, स्टेशन सुपरवायझर, लिडिंग फायरमॅन, ड्रायव्हर कम ऑपरेटर, फायरमन प्लस मदतनीस, अशी विविध पदे शासनाच्या नियमानुसार भरावी लागणार आहेत. त्यामुळे माणगाव नगरपंचायतीला अग्निशमन सेवा बळकटीकरणाच्या योजने अंतर्गत नियमांची शर्यत पार करावी लागणार आहे.

नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांच्या कार्यकाळात खा. सुनीत तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे नगरपंचायतीने अग्निशमन वाहन मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यावेळी त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या जिल्हा नियोजनमधून शीघ्र प्रतिसाद क्यूआरव्ही वाहन तथा अग्निशमन वाहन बीएस -6 आवश्यक यंत्रसामुग्री सहित खरेदी करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. तब्बल दोन वर्ष झाले, अजूनही हे वाहन नगरपंचायतीत आलेले नाही.

Exit mobile version