धुळीमुळे उरणची जनता त्रस्त

। उरण । वार्ताहर ।
सार्वजनिक बांधकाम खाते, सिडको आणि राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून उरण तालुक्यात रस्ते बनवण्यात आले आहेत. हे रस्ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले होते. हे खड्डे बुजवण्यासाठी वापरलेली माती आणि ग्रीटमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रदूषण तर होत आहेच, चालकांना वाहन चालवणेही धोकादायक ठरू लागले आहे. धुळीमुळे अपघाताची शक्यता वर्तवली जात असून, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तालुका हा औद्योगिक दृष्टीने प्रगत होत आहे. तर सिडकोच्या माध्यमातूनही वसाहती निर्माण होत आहेत. दळणवळणासाठी मोठे रस्ते तयार झाले आहेत. काही रस्ते अर्धवट अवस्थेत असून, त्यांची अनेक वर्षे कामे सुरू आहेत. त्यात काही नव्याने बनवलेल्या रस्त्यांवर पहिल्याच पावसात रस्ताच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम उघड होत आहे. खड्ड्यांना ग्रीट आणि मातीने मलमपट्टी करण्यात आली. मात्र, मातीमुळे सर्वत्र धूळ वाढू लागली आहे. उडणार्‍या या धुळीचा दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना श्‍वसनाचे आजार उद्भवू लागले आहेत.
खराब रस्त्यामुळे धूळ मोठ्या प्रमाणात आहे. दास्तान फाटा ते चिर्ले या मार्गावर रेल्वेचे काम सुरू आहे. खड्डे मातीने बुजवले आहेत. जेएनपीटी बंदर, बीएमसीटी बंदर, खोपटा-कोप्रोली, पनवेल-उरण आदी मार्गांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

Exit mobile version