पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या तयारीत वैद्यकीय अधीक्षक मशगुल
| नेरळ | प्रतिनिधी |
कुपोषणाच्या तपासणीसाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात सकाळी आलेल्या बालकांना दुपारी तीन वाजेपर्यंत खाण्या-पिण्याविना खोळंबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारी बैठकीला गेल्यामुळे ही मुले व त्यांच्या माता यांची हेळसांड झाल्याचे समजते.
कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्या बालकांना पोषण आणि पुनर्वसन केंद्रात दाखल करून नियमितरीत्या उपचार करण्यात येतात. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र आहे. तेथे कुपोषित बालकांना महिनाभर दाखल केले जाते. त्यानुसार कर्जत तालुक्यातील खांडस आणि कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील 19 कुपोषित बालकांना सोमवारी आरोग्य तपासणीसाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रातील बांगारवाडी, बलीवरे, धोत्रेवाडी, विठ्ठलवाडी येथील नऊ, तर कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील पेंढरी, बोरीचीवाडी, बोंडेशेत, हऱ्याचीवाडी, उंबरवाडी, वाघेवाडी, माले आणि जांभूळवाडी येथील 11 अशा एकूण 19 बालकांचा समावेश होता. स्थानिक अंगणवाडी केंद्राच्या सहायक आणि युनायटेड वे या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या सर्व बालकांच्या पालकांची समजूत काढून बाल उपचार केंद्रात दाखल करून घेण्यासाठी आणले होते.
सर्व बालके दोन रुग्णवाहिकेतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दुपारी अकरा वाजता आणण्यात आली. त्यातील बहुसंख्य कुपोषित बालके ही आपल्या घरातून सकाळी लवकर निघाली होती, मात्र त्याचवेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विजय मस्कर हे पनवेल येथे बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे कुपोषित बालकांना तपासण्यासाठी कोणी वैद्यकीय अधिकारी दुपारपर्यंत उपलब्ध नव्हता. डॉ. मस्कर यांनी एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून जाणे आवश्यक होते. अखेर तीन वाजता कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालय येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रतिक झेंडे हे येथे पोहचले. त्यानंतर मुलांची तपासणी सुरू झाली. मात्र तोपर्यंत या सर्व 19 बालकांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा आहार देखील दिला गेला नव्हता. दरम्यान, कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तीन अतितीव्र कुपोषित बालके गेल्या आठवड्यापासून उपचार घेत आहेत.