राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाची मागणी
| खरोशी | वार्ताहर |
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने एप्रिल-मे महिन्यात राबवली जाते. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने ती राबवली गेली नाही. ही प्रलंबित बदली प्रक्रिया पवित्र पोर्टल शिक्षक भरतीपूर्वी राबवावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाने केली आहे.
शैक्षणिक वर्ष 2024/25 ची सेवाजेष्ठता ग्राह्य धरावी, प्रचलित बदलीचे ऑनलाईन पद्धतीचे बदली धोरण कायम ठेवावे, यापूर्वी फॉर्म भरलेल्या शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेत प्राधान्यक्रम बदलण्यास संधी द्यावी व जून 2025 पात्र निकष लावून नव्याने पात्र होणार्या शिक्षकांना ही आवेदन पत्र भरण्यास संधी उपलब्ध करून द्यावी. वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या, पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महिला/पुरुष शिक्षकांना कौटुंबिक न्याय द्यावा अन्यथा आपल्या न्याय्य हक्कांसाठी व संविधानिक मागणीसाठी आपल्या कुटुंबासह बदली प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे दुर्लक्षित होत असलेल्या या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऑनलाइन बदली प्रक्रियेचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने ग्रामविकास विभागाकडे करण्यात आलेली आहे.
निवेदनावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले, सरचिटणीस संतोष भोजणे, राज्य प्रसिद्धीप्रमुख लहू राक्षे, राज्य पदाधिकारी सुखदेव भालेकर, बबनराव चव्हाण, रंगनाथ सगर, नरेंद्र कुटे, धनंजय काकड, श्रीराम पळसकर, नागनाथ राजुरे, मनोहर राठोड,राजन पाटील, आदी पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.