अलिबाग बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षातील फोन बंद

संपर्क साधणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग एसटी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षातील फोन बंद असल्याच्या तक्रारी आहेत. एसटीच्या वेळेची माहिती घेण्यासाठी संपर्क साधणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी आगारातील या कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे.

अलिबाग एसटी बस आगार हे जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. 60हून अधिक एसटी बसेस असून, हजारो प्रवासी एसटीतून प्रवास करतात. प्रवाशांना एसटीच्या वेळेची माहिती मिळावी, यासाठी स्थानकात नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षामध्ये वाहतूक निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियंत्रक म्हणून काम पहातात. परंतु, गेल्या दीड महिन्यांपासून एसटी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षातील फोन बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. 222006 या क्रमांकाशी संपर्क साधला, असता हा फोन कायमच व्यस्त अथवा, बंद असल्याचे सांगितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अलिबाग एसटी बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार संपर्क साधूनही फोन लागत नसल्याने आगारातील कारभाराबाबत नाराजीचे सुर निर्माण झाले आहेत. याबाबत कृषीवलनेदेखील नियंत्रण कक्षात फोन लावून संपर्क साधला, परंतु संपर्क झाले नसल्याचे उघड झाले आहे.

अलिबाग एसटी बस स्थानकातील बसेस रस्त्यात बंद पडणे, स्थानकात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्तीचा अभाव, अशा अनेक समस्या स्थानकात आहेत. आता या फोन बंद असल्याच्या समस्येत भर पडली आहे. त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

एसटी बसच्या वेळेची माहिती घेण्यासाठी अलिबाग एसटी बस स्थानकातील नियंत्रण कक्षामध्ये संपर्क वेळोवेळी केला जातो. परंतु, तो फोनच लागत नाही. त्यामुळे बसच्या वेळेची माहिती मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. एसटी बसस्थानकातील या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

रमेश पाटील
प्रवासी

स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षातील फोन बंद आहे, की नाही याची खात्री करून घेतो. बंद असल्यास तात्काळ दुरुस्त करण्यास सांगितले जाईल. तसेच तेथील निरीक्षकांकडून फोन उचलण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून आल्यास संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.

राकेश देवरे
आगार व्यवस्थापक

Exit mobile version