पुलाचा पिलर चुकीच्या जागी; महाड नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
| महाड | उदय सावंत |
महाड शहरात प्रवेश देणाऱ्या गांधारी नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामात गंभीर त्रुटी उघड झाल्याने महाड नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठेकेदाराने उभारलेला एक पिलर तब्बल एक मीटर चुकीच्या जागी बांधल्याचे समोर आले असून, यामुळे शासकीय निधीचा अपव्यय झाल्याची टीका होत आहे. गांधारी पुलाच्या कामातील गोंधळ उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी जनतेसमोर आणला आहे. या पुलाचे काम हरकत घेत तात्काळ थांबवले असून, तांत्रिक पाहणीनंतर हा पिलर पूर्णपणे तोडून नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले. वेळेत ही चूक लक्षात आल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

केंबुर्ली ते महाड मार्गावरील गांधारी नदीवरील जुना पूल नादुरुस्त झाल्याने अनेक वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद होता. महाड नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेतून नगरविकास खात्याने या पुलासाठी 8 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. निविदेनंतर 16 डिसेंबर 2024 रोजी टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, पुणे या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. याच कंपनीने सावित्री दुर्घटनेनंतर विक्रमी वेळेत पूल उभारल्याची नोंद आहे. मात्र, या कामाकडे नगरपालिका प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाड नगरपालिकेत एकच अभियंता असल्याने शहरातील विविध विकासकामांबरोबर पुलाच्या कामावर आवश्यक देखरेख राहिली नाही. त्याचा परिणाम म्हणून दोन पिलरपैकी क्रमांक एकचा पिलर आबारमेंटच्या मध्यरेषेपासून जवळपास एक मीटर बाजूला उभारला गेला. ही गंभीर बाब स्थानिक नगरसेवक वजीर कोंडेकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांना माहिती दिली. जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून काम थांबवण्याच्या सूचना दिल्या व चुकीचा पिलर तोडून नव्याने बांधण्याबाबत नगरपालिकेला लेखी पत्र दिले.
या कामाची तांत्रिक पाहणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील प्राध्यापक डॉ. सचिन पोरे यांनी केली. त्यांच्या अहवालानुसार, पिलर चुकीच्या रेषेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार महाड नगरपालिकेचे अभियंता प्रवीण कदम यांनी ठेकेदाराला पिलर पूर्णपणे तोडण्याचे आदेश दिले असून, पिलर तोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाड हे पूररेषेखालील व आपत्तीप्रवण शहर आहे. सावित्री पूल दुर्घटना, 2005 मधील दरडी कोसळणे, आंबिवली कोकण रेल्वे अपघात, 2021 चा महापूर अशा घटनांनी महाडकर आधीच भयभीत आहेत. अशा परिस्थितीत पुलाच्या बांधकामातील ही गंभीर चूक भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकली असती. वेळेत त्रुटी लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी या घटनेनंतर महाड नगरपालिकेची यंत्रणा अशा तांत्रिक कामांसाठी सक्षम नसल्याचे मत व्यक्त केले. पुढील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्यांच्या देखरेखीखाली करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पैशाचा अपव्यय
चुकीच्या जागी उभारलेला पिलर तोडून पुन्हा बांधावा लागत असल्याने शासकीय निधीचा अनावश्यक खर्च वाढला आहे. देखरेखीअभावी झालेल्या या त्रुटीमुळे कामाचा कालावधीही लांबणार असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संभाव्य धोका टळला
पूररेषेखालील, आपत्तीग्रस्त महाडमध्ये पुलाच्या बांधकामातील ही गंभीर चूक भविष्यात थेट जीवितहानीस कारणीभूत ठरू शकली असती. वेळेत त्रुटी उघड झाल्याने मोठा अनर्थ अक्षरशः थोडक्यात टळल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. सावित्री पूल दुर्घटना, दरडी कोसळणे आणि महापुराच्या आठवणी अजून ताज्या असताना अशा निष्काळजीपणामुळे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. पुलासारख्या महत्त्वाच्या कामात झालेली ही चूक धोक्याची घंटा मानली जात आहे.
पुलाच्या कामातील ही चूक अत्यंत गंभीर होती. शासकीय पैशाचा अपव्यय झाला आहे. वेळेत लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. पुढील काम तांत्रिक सक्षम यंत्रणेकडे द्यावे.
-संदीप जाधव,
उपनगराध्यक्ष, महाड







