खारेपाटातील पाईपलाईन निकृष्ट दर्जाची

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराचे फावले; नागरिकांकडून संताप व्यक्त

| पेण | प्रतिनिधी |

पेण खारेपाटाला पाणी मिळावे म्हणून शेतकरी कामगार पक्षाने इमान इतबाराने प्रयत्न केला. त्यावेळेला एमएमआरडीमधून साधारणतः 40 कोटींचा निधी मंजूर झाला. त्यानंतर कागदपत्री घोडे नाचून सर्व निविदा प्रक्रिया झाली. निविदा प्रक्रियेमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाला ते काम मिळाले आणि कामाला सुरूवातदेखील झाली. परंतु, पाईपलाईनचे काम अनुभव नसतानाही ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि योजनेचा बट्ट्याबोळ झाला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराचे फावले आणि पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप पेणकरांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पाइपलाइन फुटण्याचे पाप ठेकेदाराबरोबरच अधिकाऱ्यांचेदेखील आहे, असे बोलले जात आहे.

खारेपाटातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम ठेकेदार आर.एम. पारवे परभणी याने गाजावाजा करून सुरू केले. परंतु, त्याच्याकडे यंत्रसामुग्री कमी असल्याने ज्या वेगाने काम व्हायला हवे होते, त्या वेगाने काम झाले नाही. त्यानंतर या ठेकेदाराने सबठेकेदार म्हणून स्थानिक राजकीय नेत्यांच्या पालख्या वाहणाऱ्या अनुभवशून्य व्यक्तींना ठेका दिला आणि त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांना काम दिल्याने काहीसा कामाच्या दर्जाकडे कानाडोळा झाला. त्यामुळे काम इस्टिमेंटप्रमाणे झाले नाही, तरी या राजकीय बगलबच्च्यांनी कोल्हेकुही केली नाही. त्यातच सबठेकेदार हे राजकीय नेत्यांचे बगलबच्चे ठेकेदार म्हणून काम करत असल्याने त्यांनीदेखील इस्टिमेंटप्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचा काम करण्यास सुरूवात केली. महत्त्वाची बाब म्हणजे, या बगलबच्च्यांना अशा पाईपलाईनचा काम करण्याचा कोणताच अनुभव नव्हता. ज्या प्रमाणात पाईपसाठी खोदाई करायला हवी होती, ती खोदाई झाली नाही. तसेच ज्या ठिकाणी पाईपलाईनला जॉइंट असते, त्या ठिकाणी विटांच्या आणि सिमेंटच्या सहाय्याने थडगा बांधणे गरजेचे होते. परंतु, तसे केले नाही. त्यानंतर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, हा ठपका ठेवू आर.एम. पारवे या ठेकेदाराचा महाराष्ट्र जीवन प्राधिकीकरणाकडून ठेका काढण्यात आला. परंतु, या ठेकेदाराचा ठेका काढून निकृष्ट दर्जाच्या कामाची भरपाई होणार नव्हती. त्यातच निकृष्ट दर्जाचे काम करणारे सबठेकेदारांनी राजकीय वजन वापरून आपली बिलं काढून घेतली. त्यांचे पैसे मिळताच या ठेकेदारांनी हात वर केले. खरी जबाबदारी जरी आर.एम. पारवे यांची असली, तरी सबठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, तेही तेवढेच जबाबदार आहेत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

आर.एम. पारवे यांच्याकडून या कामाचा ठेका काढून एम.टी. फर्म या कंपनीला ठेका दिला आहे. हे सध्या खारेपाटाच्या पाईपलाईनचे काम करत आहेत. त्यांचे कामही नियोजनशून्य आहे. मात्र, ते अगोदरच्या ठेकेदाराकडे बोट दाखवत आहेत. अगोदरच्या ठेकेदाराकडे बोट दाखविणे चुकीचे नाही; परंतु ज्या वेळेला एम.टी. फर्म याने अर्धवट ठेका घेतला, त्यावेळेला काम काय स्थितीत आहे याची माहिती घेऊनच ठेका घेतला असावा. त्यामुळे त्यांनी केलेल्या चुका नवीन ठेकेदाराने सोडविणे गरजेचे होते. परंतु, या कामात अक्षरशः चालढकलपणा सुरू असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.

जॉइंटवर पाईप फुटत असल्याने प्रत्येक जॉइंटवर सिमेंटरचा थडगा बांधणे क्रमप्राप्त आहे. तसेच या पाईपलाईनला योग्य खोदाई करून टाकली असती तर आज पाण्याच्या दाबाने जमिनीतून पाईपलाईन बाहेर आली नसती अथवा जॉइंट वर फुटली नसती. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच होत आहे. त्यातच ज्या वेळेला वाशी आणि वढाव येथील पाण्याच्या टाक्या गुरूत्वाकर्षणाने (ग्रॅव्हिटीने) भरण्यासाठी पाण्याला प्रेशर दिला जाईल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने या निकृष्ट कामाचा पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही. आज फक्त जॉइंटवर पाईप फुटत आहे. पण, प्रेशर दिल्यानंतर पूर्ण पाईपलाईन बाहेर येऊ नये म्हणजे झालं. खारेपाटाची पाणी योजना निकृष्ट दर्जाची होण्यामागे ठेकेदार जेवढा जबाबदार आहे, त्यापेक्षा दहा पटीने लक्ष्मी दर्शनाची भुरळ पडलेले अधिकारी जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांनी जर इस्टिमेंटप्रमाणे काम करून घेतले असते, तर ठेकेदाराची निकृष्ट काम करण्याची हिंमत झाली नसती. खारेपाटाच्या पाईपलाईनचा काम निकृष्ट दर्जाचे होण्याचे पाप ठेकेदारांबरोबर अधिकाऱ्यांचेही असेच म्हणावे लागेल.

खारेपाटाच्या पाईपलाईनचे काम अनुभवशून्य ठेकेदार करत असल्याने या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी नवीन नेमलेल्या ठेकेदाराने पूर्ण केल्या नाही तर भविष्यात ही योजना कागदावर पूर्ण होईल; परंतु नागरिकांना लाभ मिळणार नाही.

प्रकाश माळी,
खारेपाट विकास संकल्प संघटना

खारेपाटातील पाण्याच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे होण्यामागे राजकीय पुढाऱ्यांचे बगलबच्चे व अधिकाऱ्यांची कामाप्रती नसलेली आस्था हे खरे कारण आहे. आपल्याला पगार राजकीय पुढारी अथवा ठेकेदार देत नाही, तर जनतेच्या करातून पगार मिळतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेचे हित बघणे गरजेचे होते. परंतु, अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे हित पाहिले. म्हणूनच खारेपाटाच्या पाणीपुरवठा योजनेची अवस्था बिकट आहे. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी वर्गच आहेत.

दिलीप पाटील,
अध्यक्ष, 24 गाव सेझ विरूध्द शेतकरी संघटना
Exit mobile version