पत्रकारांच्या दणक्याने बुजविला खड्डा

| उरण | वार्ताहर |
उरण शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याबाबत उरण नगरपालिकेला निदर्शनास आणूनही त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्याच्या निषेधार्थ उरण तालुका मराठी पत्रकार संघाने नगरपालिका प्रशासनाच्या गेटबाहेर असलेल्या खडड्यात धोतर्‍याचे फुलझाड लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला. तसेच लवकरात लवकर शहरातील खड्डे बुजवावे अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला आहे. याची दखल घेत उरण नगरपालिकेने त्वरित खड्डा बुजविला आहे. याबद्दल जनतेकडून उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अभिनंदन केले जात आहे.

गेली काही दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणच्या रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. काहीवेळा दुचाकी खड्ड्यात पडून अपघात झाला आहे. तरीही नगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नव्हती. विशेष म्हणजे, नगरपालिका प्रशासनाच्या गेट बाहेर मोठा खड्डा गेले अनेक दिवसांपासून आहे. त्याकडे ते लक्ष देत नाहीत, तर शहरातील इतर खड्ड्यांकडे कसे लक्ष देतील, असा सवाल उपस्थित होत आहे.

खड्डे बुजविण्याकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करीत नगरपालिका प्रशासनाच्या कार्यालयाबाहेरील गेटसमोरील खड्ड्यात धोतर्‍याच्या फुलाचे झाड लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात केला होता. या आंदोलनाची दखल उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी घेत त्वरित खड्डा बुजविला आहे. याबद्दल पत्रकार संघाने मुख्याधिकारी संतोष माळी यांचे आभार मानले आहे.

Exit mobile version