सरकारच्या नियमाचा कोट्यवधी महिलांना फटका; विरोधकांची टीका खरी ठरली
| खास प्रतिनिधी | रायगड |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सरकारने राज्यात चांगलाच गाजावाजा केला होता. सुरुवातीला बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात नोंदणी करणार्या महिलांना सरकारच्या नियमाचा फटका बसणार आहे. त्यांच्या खात्यात त्याच महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार असून, जुलै-ऑगस्ट महिन्यांची रक्कम त्यांना मिळणार नसल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. या नियमामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांचा हिरमोड झाला असून, विरोधकांनी या योजनेवर केलेली टीका आता खरी ठरत असल्याचे दिसत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती. त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील, त्यांना त्या महिन्यापासूनच लाभ मिळले, असे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यांना आधीच्या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे महिलांमध्ये कमालीची नाराजी असून, पुढील कालावधीत याचे विपरीत परिणाम सरकारला भोगावे लागणार असल्याचे बोलले जाते.
सरकारने 1 जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेसाठी राज्यभरातून 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सरकारने ऑगस्टमध्ये जमा केला. त्यामुळे लाभार्थी महिलांना एकत्रित तीन हजार रुपये मिळाले. सरकारने 17 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात केली असून, आतापर्यंत दीड कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसल्याने काहींचे पैसे जमा झालेले नाहीत. आधार लिंक झाल्यानंतर पैसे जमा केले जाणार आहेत.
या योजनेवर सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आधीच वित्तीय तूट वाढत असल्याने अशा योजना अंमलात आणणे धाडसाचे ठरणार होते. यासाठीच अर्थ व नियोजन विभागाने यावर आक्षेप घेतला होता. परंतु, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारला फायदा उचलायचा होता. यासाठी महिलांना आमिष दाखवत असल्याची टीका विरोधकांनी केली होती.
महिलांमध्ये नाराजी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे. पण, ज्या महिला ही तारीख चुकवतील,1 सप्टेंबरनंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत.त्यामुळे महिलांमध्ये कमालीची नाराजी असून, पुढील कालावधीत याचे विपरीत परिणाम सरकारला भोगावे लागणार असल्याचे बोलले जाते.