| विरार | प्रतिनिधी |
वसई-विरार शहरात कोट्यवधींचा खर्च करून रस्त्याच्या मधोमध दुभाजक बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये सुंदर दिसणारी फुलझाडे लावली आहेत. मात्र, सध्या ही झाडे पाण्याअभावी सुकली असल्याचे चित्र दिसून आले आहे. या झाडांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने त्यांची रया गेली आहे.
नालासोपारा शहराच्या पूर्वेला मुख्य रस्त्यांमध्ये दुभाजक असून त्यावर झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. लोकांनी दुभाजक तोडू नयेत, असा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, या झाडांना पाणीच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे यातील काही झाडे सुकली आहे. पालिकेकडून या दुभाजकांची साफसफाई देखील केली जात नाही. तर शहरातील वाहन चालक गोवा गुटख्याच्या पानाच्या पिचकार्या मारतात. यामुळे दुभाजकावर काढण्यात आलेले चित्रदेखील दिसेनासे झाले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, वसईत महापालिकेतर्फे शहरातील दुभाजकात झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जनतेच्या पैशाचा धुरळा केला जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तर शहरात विविध सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत असतात. शिवाय रोपांचे संवर्धन व जतन करता यावे म्हणून रोपांभोवती पिंजरेदेखील लावतात. काही ठिकाणी वृक्षांना टँकरने पाणीदेखील दिले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने वृक्ष सुकून गेले आहेत. वसई, नालासोपारा, विरारच्या मुख्य रस्त्याला लागून असलेली तसेच मोकळ्या जागेतील व डोंगराळ भागातील अनेक झाडे सुकली आहेत. तर लहान रोपांची अवस्थादेखील बिकट आहे. एकीकडे प्रदूषणवाढ रोखण्यासाठी वृक्ष बचाव मोहीम हाती घेतली जाते. वृक्षारोपण केले जाते; मात्र पुरेसे पाणी न मिळाल्याने झाडे सुकून जात आहेत. पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.