| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री जागोजागी पार्ट्या होतात. मद्यप्राशन करून वाहन चालविणे, मारामारीचेही प्रकार यावेळी घडतात. त्यातच निवडणुकांचा हंगाम सुरू असल्याने पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाची देखील तयारी सुरू आहे. थर्टी फर्स्टच्या दिवशी धिंगाणा घातला तर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालवू नका आणि कारवाईचे संकट स्वतःहून ओढवू नका असे आवाहन केले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ब्रेथ मशीनद्वारे वाहन चालकाची तपासणी करून कारवाई होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक सुरू असल्याने यंदाची थर्टी फर्स्ट जंगी होणार आहे. पनवेल तालुक्यात अनेक फार्म हाऊस आहेत. या फार्म हाऊसचे यापूर्वीच बुकिंग झालेली आहे. थर्टी फर्स्टच्या दिवशी अनेक जण फार्म हाऊसमध्ये जाऊन मौज मज्जा करतात आणि नववर्षाचे स्वागत करतात. पनवेल तालुका पोलिसांद्वारे खारपाडा, कोन, नेरे येथे नाकाबंदी असणार आहे. तर पनवेल वाहतूक शाखेतर्फे आदई सर्कल, ठाणा नाका गार्डन हॉटेल सिग्नल, शिवशंभो नाका पनवेल, वडघर नाका, उरण नाका ब्रिज या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पनवेल तालुका पोलिसांतर्फे 2 पीआय, 8 पीएसआय/एपीआय, 48 पोलीस स्टाफ असे एकूण 58 पोलीसांची नजर राहणार आहे. तर पनवेल वाहतूक शाखेचे तीन ऑफिसर आणि 20 स्टाफ यावेळी विविध ठिकाणी हजर राहणार आहेत. मद्यपींमुळे इतरांच्या जीवाला धोका असतो. मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघात होण्याची शक्यता असते तसेच वाहन दुसऱ्या वाहनाला धडकून मोठा अपघात होऊ शकतो आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मद्य प्राशन करून वाहन चालवल्यास दहा हजार रुपयाचा दंड आहे. त्यामुळे वाहन चालवताना मदय प्राशन करून वाहन चालवू नका असे आवाहन करण्यात येत आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस सज्ज

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606