| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सरत्या 2025 या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच 2026 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल झाले आहेत. स्थानिक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस सज्ज आहेत. जिल्ह्यात 1 हजार 388 सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. त्यात 105 अधिकारी, 672 अंमलदार, 80 वाहतूक पोलीस आणि 200 होमगार्डचा समावेश आहे. तसेच तीन आरसीपी पथकांचीदेखील मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचा पहारा ठेवला जाणार आहे.
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी शुक्रवारपासून दिवसांपासून पर्यटकांनी रायगड जिल्ह्यात येण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर मुक्काम ठोकला आहे. विविध हॉटेल, रेस्टॉरंट, कॉटेजेस बुक झाले आहेत. याठिकाणी नाईट पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर वेगवेगळ्या सवलती ठेवण्यात आल्या आहेत. मद्याचे पेले रिचवत आणि गाण्याच्या ठेक्यावर पर्यटक धमाल करण्यास सज्ज झाले आहेत. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, काशीद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. पर्यटक दाखल झाल्याने हॉटेल, रिसॉर्ट, कॉजेट, लॉजिंग, पर्यटनावर आधारित असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चंगळ होत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. पर्यटक स्थानिकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आहेत. जिल्ह्यात एक हजार 388 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये दोन होमगार्ड, तीन आरसीपी पथक, 105 पोलीस अधिकारी व 672 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कॅटरससह खाणावळी सज्ज
पर्यटकांना घरगुती पद्धतीच्या भोजनांचा आनंद घेता यावा यासाठी स्थानिक कॅटरस, खाणावळी यादेखील सज्ज झाल्या आहेत. मोदक, डाळ-भात, पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांबरोबरच मटण वडे, कोंबडी वडे, तसेच ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर पदार्थांवर पर्यटकांना चांगलाच ताव मारता येणार आहे.
गैरकृत्यांवर राहणार नजर
रायगड पोलीस दलाच्या अखत्यारीत 28 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या दृष्टीने जिल्ह्यात विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. हॉटेल, धाबे, कॉटेजेस, फार्महाऊस येथे होणाऱ्या गैरकृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दारु पिऊन धिंगाणा घालणे, दारु पिऊन वाहन चालविणे, गांजा, व इतर अंमली व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस पथके व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
महिलांच्या सुरक्षेवर विशेष पथक
थर्टी फर्स्टच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटक दाखल झाले आहेत. लाखो पर्यटक या दिवशी जिल्ह्यात असणार आहेत. वेगवेगळ्या हॉटेल, कॉटेजेसबरोबरच मोकळ्या जागेत व समुद्रकिनारी पर्यटकांची अलोट गर्दी असणार आहे. नववर्षाच्या स्वागतादरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. गर्दीचा फायदा घेत महिलांना धक्काबुक्की करणे व इतर काही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांचे पथक साध्या गणवेशात राहणार आहे. अलिबाग, काशीद, नागाव, दिवेआगर, मुरूड, मांडवा, श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांबरोबरच शहरातील आणि तालुक्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये साध्या गणवेशातील पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक काम करणार आहेत.
सायबर सेलचे राहणार लक्ष
शाळा, महाविद्यालयांमध्ये वेगवेगळी शिबिरे घेऊन सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक करण्याचे आवाहन कायमच केले जाते. मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना सोशल मीडियाचादेखील वापर होत आहे. नववर्षाच्या निमित्ताने जिल्ह्यात स्थानिकांसह पर्यटकांची प्रचंड गर्दी होणार आहे. समाजमाध्यमांवर कोणीही व्हीडीओ, छायाचित्र, ऑडीओ क्लिपद्वारे आक्षेपार्ह मेसेज टाकून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे. सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह मेसेज, व्हीडीओ टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.
दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांनो सावधान
थर्टी फर्स्टच्या निमित्ताने जिल्ह्यातील दारुची दुकानांमध्ये खरेदीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. लाखोची उलाढाल होण्याची शक्यता आहे. परंतु, अनेकजण दारु पिऊन वाहन चालवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत ब्रेथ अनालायझरद्वारे चालकांची तपासणी केली जाणार आहे. दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर या यंत्राचे लक्ष राहणार आहे.





