पनवेल शहरातील दोन गुन्हे उघडकीस
| पनवेल | वार्ताहार |
पनवेल शहरासह खांदेश्वर, मानपाडाआणि रोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे सलग तीन दिवसात सहा चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून सुमारे सहा लाख 32 हजार 120 रुपये किमतीचे चोरीचे दागीने तसेच गुन्ह्यात वापरलेली नवीन मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
पनवेल शहरातील प्रभू आळी येथे राहणाऱ्या सुप्रिया टेंभे (वय 54) यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच तक्का येथे राहणाऱ्या मीनाक्षी महाजन यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी खेचून ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार हे त्यांच्या पथकासह सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करीत असताना चोरट्यांनी खांदेश्वर आणि मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा अश्याच प्रकारे गुन्हा केल्याचे दिसून आले. अधिक तांत्रिक तपासामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी वीरू राजपूत (वय 23) रा. माणगाव व त्याचा साथीदार सुखवीर रावल (वय 28) रा. माणगाव यांना मानपाडा पोलिसांनी माणगाव येथून ताब्यात घेतले. अधिक चौकशीमध्ये या दोघांनी त्याच दरम्यान रोहा येथे सुद्धा दोन जणांचे दागिने चोरले असल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्या अटकेने एकूण सहा गुन्हे उघडकीस आले.
महिला वर्गाने लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रमाला दागिने घालून जाताना आपल्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी घ्यावी. शक्यतो समारंभाच्या ठिकाणीच दागिने घालावेत व रस्त्याने जाताना काळजी घ्यावी. सन 2023 मध्ये जवळपास चैन स्नॅचिंगचे वीस गुन्हे पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले असून त्यातील 18 गुन्हे उघडकीस आणले आहेत. उर्वरित दोन गुन्हयाचा तपास सुरु असून ते सुद्धा लवकरच उघडकीस येतील.
-वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे