| पनवेल | प्रतिनिधी |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 ते 11 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सिंधुदुर्ग येथे यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून सुमारे 400 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मुंबई विभागातून 10 पुरुष व 10 महिला खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये पोलीस मुख्यालय कुस्ती संकुलाचे 6 कुस्तीगीर सहभागी झाले होते. या कुस्तीगीरांनी उत्कृष्ट तंत्र, जिद्द व मेहनतीच्या जोरावर 3 सुवर्णपदके व 3 कांस्यपदके पटकावत संकुलाचे वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे 3 सुवर्णपदक विजेत्या कुस्तीगीरांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत सोहम ढगे (38 किलो) वेदांत येळकर (68 किलो) आणि स्वप्निल लावंड (75 किलो) याने सुवर्णपदक पटकावले. तर, यश घुगे (62 किलो) हृषिराज पाटील (52 किलो) आणि संशिखा शर्मा (33 किलो) यांनी कांस्यपदक पटकावले आहे. अशाप्रकारे एकूण 6 पदके मिळवत पोलीस मुख्यालय कुस्ती संकुलाने राज्यस्तरावर आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक व संकुल व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पोलीस मुख्यालयाची दैदीप्यमान कामगिरी
