पोलीस उपनिरीक्षकाला डिझेलमाफियांने नेले फरफटत

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान या डिझले माफियांची मजल इथपर्यत गेली आहे कि त्यांनी काही दिवसांपूर्वीच चक्क पोलीस उपनिरीक्षकालाच गाडीतून फरफटत नेल्याची घटना घडली आहे. मात्र या जिगरबाज पोलीस अधिकार्‍याने आपल्या जीवाची तमा न बाळगता आरोपीला गाडीतून खेचून बाहेर काढले.

पनवेल-गोवा महामार्गावरील शिरढोण गावाजवळच्या ढाब्यांजवळ उभ्या असलेल्या ट्रेलर-ट्रक या मोठ्या वाहनांमधून डिझेल चोरी होत असल्याच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुषंगाने याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस शिपाई प्रसाद घरत, विवेक पारासूर यांचे पथक रात्रीच्या वेळी तिथे गस्त घालत होते. शिरढोण येथे एका ट्रेलरमधून डिझेल चोरी करत असल्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांनी तात्काळ गाडीचे हेडलाईट बंद करून गुपचूप त्यांचा पाठलाग केला असता पोलिसांना पाहून आरोपी शेरसिंह राठोड आणि शहाबाज अन्सारी यांनी आपल्या वाहनातून पळायला सुरुवात केली.

यावेळी उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांनी धावत जाऊन एका आरोपीला गाडीत बसत असताना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी चालकाने गाडी सुरु करून त्यांना काही अंतर फरफटत नेले. यात शिंदे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली मात्र त्यांनी जीवाची तमा न बाळगता त्या आरोपीला खेचून खाली पाडले. या दरम्यान पोलीस शिपाई प्रसाद घरत, विवेक पारासूर यांनी गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवत दुसर्‍या आरोपीलाही पकडले. दुखापत झालेली असताना हि पोलिसांनी केलेल्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version