देशाचा राजकीय मूड बदलतोय; शरद पवारांचे भाकित

| बारामती | प्रतिनिधी |

देशात नुकताच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे पाहिले तर देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. बारामती येथे पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी अनेक प्रश्‍नांना उत्तरे दिली. तीन निवडणुका, पुण्यातील पोटनिवडणूक, काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, विधानपरिषद निवडणूक या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगासंबंधी काही शंका राजकीय पक्षांनी उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेत बदल केला आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत आता पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेत्याचा समावेशअसणार आहे. हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय आहे.

शरद पवार, खासदार

एकंदरीत देशाचं चित्र बघितलं तर आज केरळ, तामिळनाडूमध्ये भाजपा नाही. आगामी काळात निवडून येण्याची शक्यताही नाही. कर्नाटकमध्ये आधी काँग्रेसचं सरकार होतं. पण आमदार-खासदार फोडून तिथे भाजपाने सत्ता स्थापन केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत लोक मतदान करताना, याचा नक्की विचार करतील. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबमध्येही भाजपा नाही. पश्‍चिम बंगाल आणि हिमाचलमध्येही भाजपा नाही. यावरून देशात बदलाचे वारे वाहू लागल्याचं दिसून येते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. पवारांनी नागालँडच्या जनतेचेही आभार मानले. नागालँडमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं आहे. आम्हाला मिळालेल्या मतांची टक्केवारीही चांगली आहे. यासाठी मी नागालँडच्या नागरिकांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.

Exit mobile version