लोकप्रतिनिधींचे जाणिपूर्वक दुर्लक्ष; नागरिकांचा आरोप
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायत हद्दीतील बोरघर गावची स्मशानभूमीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करताना ग्रामसस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे आतातरी लोकप्रतिनिधी किंवा ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित करीत आहेत.
बोरघर गावाच्या स्मशानभूमीची शेड जीर्ण अवस्थेत असून, अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना मुसळधार पावसात झाडा झुडपांचा आसरा घ्यावा लागतो. तसेच, मृतदेह ठेवण्यासाठी जे लोखंडी पोल उभे केले होते, ते सुद्धा गंजून नष्ट झाले आहेत. त्या ठिकाणी बांधलेला चौथरा देखील जीर्ण अवस्थेत असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना त्या ठिकाणी लाकडी डांबे उभे करून उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे. हा प्रश्न गेले 2 ते 3 वर्ष प्रलंबित असून, या स्मशानभूमीची अवस्था अधिकच बिकट होत चाललेली आहे. त्या शिवाय नागरिकांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था देखील नाही. रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे तेथे लाईटची सुद्धा व्यवस्था नाही. त्यामुळे अंत्यविधी करताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणाचा बोरघचे गणेश कडव हे पाठपुरावा करीत असून संबंधित प्रशासन जाणिव पूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा अरोप नागरिकांमधून होत आहे.
पावसाळ्यात संरक्षण देणारी निवारा शेड व चौथरा तसेच रात्रीच्या वेळी अंत्यविधी किरण्यासाठी विद्युत रोषणाईची व्यवस्था तळाघर-बोरघर ग्रामपंचायतीने किंवा लोकप्रतिनिधी यांनी त्वरित करून द्यावी. त्याचबरोबर परिसरातील स्वच्छता व देखभाल करण्यासाठी निधी मंजूर करून द्यावा.
निखिल वाळंज,
ग्रामस्थ
बोरघर स्मशानभूमीचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. परंतु, जिल्हा नियोजन मंडळ किंवा आमदार फंडातून निधी उपलब्ध झाला तर निश्चित त्या ठिकाणी काम करू.
अर्चना पाटील,
ग्रामसेविका, तळाघर







