विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या जिवाला धोका
। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरुन कोलाड हायस्कूलकडे जाणार्या रस्त्याचे तीनतेरा वाजले असुन रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न या मार्गावरून प्रवास करणार्यांना पडला आहे. तसेच, या मार्गाने प्रवास करणार्या विद्यार्थ्यांसह रहिवाशी नागरिक आणि प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर प्राथमिक मराठी केंद्र शाळा, द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रहिवाशी वस्ती तसेच धाटाव एमआयडीसीकडे जाणारा जवळचा मार्ग असल्यामुळे तेथे कामावर जाणारे असंख्य कामगार याच मार्गाने ये-जा करीत असतात. गेली दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था बिकट बनली आहे. तसेच, हा रस्ता अरुंद असल्यामुळे या रस्त्यातून मार्ग काढतांना प्रवाशी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या पावसाळ्यात या मार्गाने जात असताना दुचाकीस्वाराला खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला होता. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. त्यामुळे या मार्गानी प्रवास करणारांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम पूर्ण होईल काय, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून होत आहे.