कशेळे भागातील रस्त्याची दुरवस्था
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील 50हून अधिक गावे आणि आदिवासी वाड्यांची कशेळे बाजारपेठ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. बाजारपेठमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग रस्ता खड्ड्यात हरवला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उडणारे धुळीचे लोट लक्षात घेऊन व्यवसाय बंद करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. दरम्यान कशेळे बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या भागातील अपूर्ण रस्त्याचे तात्काळ काँक्रटीकरण करावे, अशा मागणीचे निवेदन स्थानिक व्यावसायिकांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहे.
कशेळे-कर्जत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेषतः कर्जत बाजारपेठ येथील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. कशेळे नाका, पेज नदी वंजारवाडी या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पेज नदी पुलावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि समाजमाध्यमांवर सातत्याने आवाज उठवला जात आहे. त्यात रस्त्यावरून वाहनांची सतत वर्दळ असते. त्याचा परिणाम रस्त्यावरुन वाहने गेल्यावर धुळीचे लोट उडतात. धुळीमुळे दुकानांमधील साहित्य खराब होत आहे. हा सर्व प्रकार मागील तीन महिन्यापासून वाढला आहे. रस्त्यावरील खड्डे आणि धुळीचे लोट यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.
या रस्त्यावर थोडीफार डागडुजी करून ठेकेदारांनी हात झटकले. कशेळे गावातील ग्रामस्थ आणि व्यापारी संघटना यांनी गणपती काळात स्वखर्चाने कशेळे गाव ते वंजारवाडीपर्यंत मुरूम टाकून खड्डे भरले. त्यामुळे वाहन चालकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु, पावसाळ्यानंतर या मुरुमाचा धुरळा होऊन कशेळे बाजार पेठेतील सर्व दुकानात आणि आजूबाजूच्या घरात धूळ उडून नागरिकांना श्वसनाचे विकार होत होते. सरकारी दवाखाना परिसरातील खड्ड्यांमुळे दवाखान्यात जाणाऱ्या गरोदर महिलांना त्रास होत होता. याबाबत कशेळे ग्रामस्थांनी रस्त्याची दुरुस्ती लवकर व्हावी, याकरिता संबंधित अधिकारी यांना उपोषणाचा ईशाराही दिला होता. परंतु, या बाबतही सर्वच अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
पंधरा दिवसात खड्डे बुजवण्याचे आश्वासन
कशेळे येथील सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, राजेंद्र हरपूडे, सचीन राणे, दिनेश हरपूडे, विजय शिंदे यांनी मुंबई येथे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयात जाऊन उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेतली. रस्त्यावरील खड्डयासंदर्भात चर्चा करून ते बुजवण्याबाबत विनंती केली असता कार्यकारी अभियंता अरुण देवकाते यांनी या रस्त्यावरील सर्व खड्डे पंधरा दिवसात बुजवण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचवेळी रस्त्यावर अपूर्ण असलेले काँक्रिटीकरणाचे काम देखील सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.







