| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
रेवदंडा हायस्कूल ते स्मशानभूमी आणि समुद्रकिनार्याकडे जाणारा सिमेंट काँक्रिटचा रस्ता सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा नागरिक व पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या या रस्त्यावरून सिमेंट गळून गेले आहे, सर्वत्र खडी बाहेर आली आहे, रस्त्यावरची वार्याबरोबर सिमेंट पावडर डोळ्यात अंगावर उडत आहे. त्यामुळे कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का? एक्सपायरी सिमेंट वापरले का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, रस्त्याचे बिल पास करण्यासाठी सरकारी अधिकार्यांना व स्थानिक नेत्यांना ‘बंद पाकीट’ द्यावे लागते, आणि या दलालीच्या व्यवहारामुळे रस्त्याचे काम केवळ कागदावरच पूर्ण झाले. प्रत्यक्षात मात्र सामान्य नागरिकांना खड्डे, टोचणारी खडी आणि अपमानित अनुभव मिळतो आहे. पर्यटक समुद्रातून पोहून आल्यावर अनवाणी चालताना त्यांच्या पायांना खडी टोचते. स्मशानभूमीकडे मयत नेताना वयोवृद्ध आणि पादचारी यांना जीव मुठीत धरून चालावं लागते. ग्रामपंचायतीच्या देखरेखीतील हा रस्ता असून, तरीही या कामावर कोणतीच तांत्रिक व प्रशासकीय जबाबदारी घेतली जात नाही, असा ग्रामस्थांचा आक्रोश आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व संबंधित अधिकार्यांकडून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मरणानंतर तरी माणसाला नीट रस्ता मिळावा अशी अपेक्षा आहे, पण इथे तेही नशिबात नाही.
– संदीप खोत, माजी ग्रामपंचायत सदस्य






