हुतात्मा स्मारकात बकऱ्यांचा गोठा
| रेवदंडा | निलेश फुंड |
15 ऑगस्ट म्हणजे देशभक्तीच्या गोडगोष्टी, ध्वजारोहण आणि भाषणांचा पाऊस. पण, देशासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांचं रेवदंड्यातील स्मारक मात्र उपेक्षेच्या खोल खाईत ढकललं गेलंय. स्मारकाभोवती झाडझुडपं वाढलेली, गेटजवळ कचऱ्याचे ढिगारे, परिसरात दुर्गंधी, स्मारकात बकऱ्यांचा गोठा, दिवसाढवळ्या प्रेमीयुगुलांचं मनमोकळं ‘मनोमिलन’, रात्री दारुड्यांचा व गर्दुल्यांचा अड्डा झाला आहे. हुतात्म्यांच्या स्मारकाची ही विदारक प्रतिमा शासनाला आणि स्थानिक पुढाऱ्यांना दिसत नाही का? स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशभक्तीची गोडवी गाणाऱ्यांनी एकदा तरी या स्मारकाला भेट द्यावी! मग कळेल खऱ्या देशभक्ताचा, शेषनाथ वाडेकरांचा अपमान कसा केला जातोय, असा संताप येथील जनता करीत आहे.
हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेतो. पण, या बलिदानाचं स्मारक जर बकऱ्यांचे गोठे, गर्दुल्यांचे अड्डे आणि कचऱ्याचं डंपिंग ग्राऊंड बनत असेल, तर ही केवळ लाजिरवाणी गोष्ट नाही तर जनतेने आणि पुढाऱ्यांनी मिळून केलेली ‘राष्ट्रभक्तीची फसवणूक’ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, रायगड जिल्हा प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत सगळ्यांचं लक्ष वेधणं, ही आता काळाची गरज आहे. लोकसहभागाच्या नावाखाली योजनांची जाहिरात होते, पण हुतात्म्याच्या स्मारकासाठी एकतरी योजना किंवा निधी मिळाला का? “पुतळे उभे करायचे, भाषणं द्यायची, फलक लावायचे… पण, त्या पुतळ्यांचं काय? त्यांच्या स्मृतींचं काय? देशप्रेम केवळ 15 ऑगस्टपुरतं नको, ते कृतीत दिसायला हवं!”, असे रेवदंड्यातील जनतेचं म्हणणं आहे.
देशासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्याचं स्मारक जर कचऱ्याचं ढिगारं,गर्दुल्ल्यांचा अड्डा, बकऱ्यांचा गोठा आणि प्रेमीयुगुलांचं हॉटस्पॉट बनलं असेल, तर स्वातंत्र्यदिन साजरा करायचा अधिकारच कोणाला? देशप्रेम भाषणात नको, कृतीत दिसलं पाहिजे! रेवदंडा गावाचं हे लज्जास्पद वास्तव बदललं नाही तर ही फक्त ‘देशभक्तीची नौटंकी’ ठरेल.
संदीप म्हात्रे,
सामाजिक कार्यकर्ते