उरण-पिरवाडी रस्त्याची दुरवस्था

सीआरएस निधी योग्य दिला जात नसल्याचा आरोप

| उरण | प्रतिनिधी |

उरणमधील प्रमुख आणि अग्रणी औद्योगिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओएनजीसी कंपनीच्या पायथ्याशीच उरण-चारफाटा ते पिरवाडी हा महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत असून, नागरिक संतप्त झाले आहेत. पिरवाडी समुद्र किनारी पर्यटकांची मोठी गर्दी असते, नागाव आणि म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतून हजारो नागरिक दररोज या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र, या सर्वांची जीवनरेषाच ठरलेल्या या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांत रस्ता गेला की रस्त्यात खड्डे हेच ओळखू न येण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. याहूनही गंभीर समस्या म्हणजे या मार्गावर रात्री स्ट्रीट लाईटचा पूर्ण अभाव अंधारात प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले असून, विशेषतः महिलांना एकटं-दुकटं जाण्याची भीती वाटत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी, निवेदने आणि मागण्या करूनही ओएनजीसी प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही, असे ग्रामस्थ सांगतात.

पत्रकारितेच्या माध्यमातून वारंवार बातम्या प्रसिद्ध करूनही ओएनजीसी प्रशासन आणि संबंधित ग्रामपंचायत गेंड्याच्या कातडीचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायतही या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याशिवाय ओएनजीसी कंपनीकडून उरण तालुक्यासाठी सीआरएस निधी योग्य प्रमाणात दिला जात नाही, असा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. काही अडगळीच्या ठिकाणी फक्त नावापुरता निधी देऊन त्यावर पाचपट खर्च दाखवला जातो, अशीही चर्चा रंगत आहे. ओएनजीसीमध्ये कार्यरत दोन प्रमुख कामगार संघटना दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. मात्र जनतेसमोरील मूलभूत प्रश्न-रस्ता आणि प्रकाशव्यवस्था याकडे या संघटनांचेही पूर्ण दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे मत आहे. रक्तदान शिबिरांचे ढोल पिटले जातात, पण जनतेच्या रक्ताचा उकळा होईल अशा समस्यांकडे मात्र कोणी लक्ष देत नाही, असा टोला नागरिकांनी लगावला आहे.

ओएनजीसी प्रशासनाला ठाम मागणी केली आहे की, उरण चारफाटा ते पिरवाडी हा रस्ता तातडीने नव्याने तयार करून संपूर्ण मार्गावर स्ट्रीट लाईटची सुविधा करण्यात यावी. जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न दुर्लक्षित करणे अमान्य आहे.

-जयवंत कोळी
सामाजिक कार्यकर्ते

Exit mobile version