पोस्टमनच्या लेकीची यशाला गवसणी

जिद्दीने बनली चार्टर्ड अकाउंटंट

| नेरळ | प्रतिनिधी |

स्वप्न पाहायला श्रीमंती लागत नाही, ती साकार करायला जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांचा आशीर्वाद पुरेसा असतो. हे नेरळ गावातील एका सामान्य पोस्टमनच्या लेकीने सिद्ध करून दाखवले आहे. भारतीय टपाल खात्यात पोस्टमन म्हणून सेवा बजावणारे बाळकृष्ण दाभणे यांची कन्या सायली दाभणे हिने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण करत यशाचे शिखर गाठले आहे.

साधं घर, मर्यादित उत्पन्न आणि रोजच्या गरजांची झुंज या सगळ्यातून सायलीचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. वडील पोस्टमन म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना आई सुनीता दाभणे यांनी संसार सांभाळत मुलीच्या शिक्षणाला खंबीर पाठबळ दिले. ‌‘मुलीचे शिक्षण हेच आमचे भांडवल’ या विचारावर ठाम राहत त्यांनी स्वतःच्या अडचणी कधीच पुढे येऊ दिल्या नाहीत.सीए परीक्षेच्या तयारीदरम्यान सायलीसमोर अनेक संकटं उभी राहिली. अपयशाचे क्षण, आर्थिक मर्यादा, मानसिक ताण. मात्र प्रत्येक अपयशाला तिने शिकवण मानली. झोप, आराम, सण-समारंभ बाजूला ठेवून तिने केवळ अभ्यासालाच प्राधान्य दिले. कमी साधनांतूनही शिस्त, नियोजन आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर तिने अखेर यशाला गवसणी घातली.

Exit mobile version