वाहतूक पोलिसांनी भरले महामार्गावरील खड्डे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पावसाळा सुरू होताच मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे अवतार कार्य सुरू होते. यामुळे वाहनचालकांना तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन कोलाड येथील वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी चक्क महामार्गावरील खड्डे भरले.
अतिवृष्टीमुळे कोलाड येथील मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावत होता. महामार्ग प्राधिकरणाकडून हे खड्डे भरणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन कोलाड येथील वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी खड्डे भरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खरे तर वाहतुकीचे नियमन करणे आणि वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करणे, हे वाहतूक पोलिसांचे काम असते. पण खड्ड्यांमुळे वाहतुकीस निर्माण होणारा अडथळा लक्षात घेऊन कोलाड येथील पोलीस सुप्रेश विलास म्हात्रे आणि पोलीस शिपाई संजय झगडे या दोघांनी रविवारी फावडे आणि घमेल घेऊन खडी टाकून महामार्गावरील खड्डे बुजविले. त्यांच्या या कामाचे वाहनचालक आणि प्रवाशांनी कौतुक केले.

Exit mobile version