शेतकर्‍यांमध्येच राज्यकर्त्यांना नमविण्याची ताकद; आमदार जयंत पाटील यांचा हल्लाबोल

| मुंबई | प्रतिनिधी |
केंद्रातील मोदी सरकारला तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडून देशातील शेतकर्‍यांमध्ये राज्यकर्त्यांना नमविण्याची ताकद असते हे कृतीने दाखवून दिले असल्याचे आम.जयंत पाटील यांनी आपल्या घणाघाती भाषणातून सांगीतले. संयुक्त शेतकरी,कामगार महापंचायतीमध्ये बोलताना आ.जयंत पाटील यांनी तडाखेबंद भाषण करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर कडाडून हल्लाबोल केला.केंद्राने आणलेले तीन कृषी कायदे हे शेतकर्‍यांवर अन्याय करणारे होते.त्यामुळे या कायद्याला संयुक्त मोर्चाच्यावतीने विरोध करण्यात आला.या आंदोलनाला राज्यातूनही शेकापसह डाव्या पक्ष,संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.सरकारने कायदे मागे घेतले असले तरी अजूनही आधारभूत किंमतीबाबतचा कायद्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.त्यामुळे जोपर्यंत हा कायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय संयुक्त मोर्चाने घेतला आहे.त्या निर्णयाला राज्यातील शेकापसहित सर्वच डाव्या पक्ष,संघटनांचा पाठिंबा राहील असे ते म्हणाले. यावेळी त्यानी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.रायगडातील आदिवासींना वनजमिनींचे पट्टे देण्याचे भाजप सरकारने जाहीर केले होते.पण ते आश्‍वासन देखील या सरकारला पाळता आले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

चरी संपाचे स्मरण
आम.जयंत पाटील यांनी 88 वर्षापूर्वी अलिबाग तालुक्यातील चरी येथे स्व.नारायण नागू पाटील,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या शेतकरी संपाची आठवण आपल्या भाषणातून केली.त्यावेळी शेतकर्‍यांनी जमिनीच न पिकविल्याने सरकारला या संपाची दखल घ्यावी लागली आणि कसेल त्याची जमीन आणि कुळ कायदा हे दोन अस्तित्वात आले.त्याच धर्तीवर केंद्रातील कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडून देशातील शेतकर्‍यांनी आपली ताकद मोदी सरकारला दाखवून दिली आहे.चरीचा संप आणि सध्या सुरु असलेला शेतकर्‍यांचा संप हे एकाच स्वरुपाच आहेत,असे ते म्हणाले.

Exit mobile version