शेकापच्या सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात लाखो तरुण बेरोजगार आहेत. सन 2006 ते 2023 सालापर्यंत शिक्षक भरती झालेली नाही. लोक नोकरीच्या प्रतीक्षेत असताना सरकार खाजगीकरणाचे निर्णय आणून बेरोजगार तरुणांची चेष्टा करीत आहे. शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने जुनी पेन्शन आणू असे आश्वासित केले होते. परंतु प्रत्यक्षात जुनी पेन्शन अस्तित्वात आली नाही. हे विद्यमान सरकार फक्त कागदावर विकास दाखवत आहेत, प्रत्यक्षात विकास दिसून येत नाही. जुनी पेन्शन रद्द करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन माजी आमदार पंडित पाटील यांनी केले आहे.
मुरुड येथे रायगड जिल्हा सह चिटणीस मनोज भगत यांच्या निवास्थानी सभासद नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते आपल्या मार्गदर्शन भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा सह चिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, मनोहर बैले, विजय गिदी, मनोहर गुरव, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रीता चौलकर, विकास दिवेकर, अल्प संख्याक अध्यक्ष रिजवान फहीम, माजी सरपंच रमेश दिवेकर आदी मान्यवर यांच्यासह मुरुड तालुक्यातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांची सभासद नोंदणी संगणकाद्वारे करण्यात आली. मुरुड तालुक्यातील अनेक गावातून आलेल्या कार्यकर्त्यांची सभासद नोंदणी करण्यात आली.
माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणे अधिक आवश्यक आहे. पराभवाने खचून जाऊ नये तर अधिक जोमाने कामास सुरुवात करावी पक्ष आपल्या सोबत आहे. आमचा पराभव झाला म्हणून आम्ही घरी बसलो नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आजही तत्पर असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत विभागातील एक एक घर पिंजून काढून मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी पंडित पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सह चिटणीस मनोज भगत यांनी सांगितले कि सभासद नोंदणी हि खरी पक्षाची ताकद असून याद्वारे पक्ष किती मोठा व ताकदवान हे दृष्टीस पडत असतो. सभासद नोंदणीसाठी विभागातून उत्तम प्रतिसाद द्यावा, हिंमत हरू नका, पक्ष आपल्या सोबत आहे, एकनिष्ठेने काम करून यश प्राप्त करू, असा विश्वास भगत यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी मुरुड तालुका चिटणीस अजित कासार यांनी सांगितले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे असून जास्तीत जास्त सभासद असणे खूप आवश्यक आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शहरातील प्रभाग आणि केंद्रामध्ये जाऊन प्रत्यक्ष ऑनलाईन सभासद नोंदणी करून पक्ष मजबूत करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले.