टोमॅटोला आला पेट्रोलचा दर..

आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले; सामान्यांना फटका

| रायगड | प्रतिनिधी |

सध्या मान्सून सर्वत्र चांगलाच सक्रिय झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. आधी उन्हामुळे शेतकऱ्यांची पिके करपली होती, त्यानंतर अवकाळीने चांगलाच गोंधळ घातला होता. आता तर, पावसामुळे पिकांची नासाडी होताना दिसत आहे. आवक घटल्याने परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामध्ये सध्या टोमॅटो 100-120 रुपये किलोला म्हणजेच पेट्रोलच्या किमती मध्ये विकला जात असल्याने तो अधिक भाव खाऊन जात आहे. परंतु दर वाढल्याने किचनमधून टोमॅटो गायब झाला आहे.

भाज्यांचे दर गगनाला भिडले
बाजारात कोणतीही भाजी 50 रुपये किलोच्या खाली मिळत नाही. टोमॅटोचे दर 100-120 रुपये आहेत. आल्याच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे. आले विक्रमी किमतीला विकले जात आहे. पाव किलो आले 80 ते 100 रुपयांना विकले जात आहे. वाढत्या किमतीमुळे अनेक गृहिणी आले घेण्याचे टाळताना दिसत आहेत. यापूर्वी रखरखत ऊन आणि आता मुसळधार पाऊस यामुळे भाज्यांच्या उत्पादनात 70 टक्क्‌‍यांनी घट झाली आहे. टोमॅटो, कारली, भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, मिरची, भोपळा यासह अनेक भाज्या महागल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रात टोमॅटो 2-8 रुपये किलो होते. पण पावसाळ्याच्या तोंडावरच किंमतींनी जोर पकडला. भाव एकदम गगनाला भिडले. सुरुवातीला 80 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री झाली. आता तर काही भागात टोमॅटोचा दर 100-120 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. त्यामुळे सहाजिकच किचनच्या बजेटवर ताण आला आहे. पूर्वी दोन तीन किलो टोमॅटो घेऊन जाणारा ग्राहक आता फक्च पाव किलो टोमॅटोवर समाधान मानत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, बाजाराता टोमॅटोचा तुटवडा आहे. टोमॅटोची आवक घटली आहे. माल कमी येत आहे. मागणी जास्त असून आवक कमी आहे. महाराष्ट्रातून टोमॅटो देशभरात जातो. तो अवघ्या 20 टक्क्‌‍यांवर आला आहे. तर काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. पण भाव केवळ मेट्रो शहरातच वाढले आहेत असे नाही, निम शहरात, तालुक्याच्या पातळीवर आणि खेड्यातील बाजारात पण टोमॅटोचे भाव वाढल्याचे दिसून येते.

दरवर्षी अशीच परिस्थिती
टोमॅटोच्या किंमती यापूर्वी पण वाढल्या आहेत. दरवर्षी एकदा टोमॅटोने ग्राहकांचा खिसा कापला आहे. पण त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला ते मात्र कोडेच आहे. गेल्यावर्षी 2022 मध्ये टोमॅटोचे दर याच महिन्यात 60-70 रुपये किलो, 2021 मध्ये 100 रुपये तर 2020 मध्ये एक किलो टोमॅटोचा दर 70-80 रुपये किलो होता. यंदा उन्हाळ्यात कडक ऊन आणि अवकाळी पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी टोमॅटोला भाव मिळत नसल्याने तो फेकून देण्याची वेळ आली होती. कृषी उत्पादने सुरक्षित ठेवण्याची तरतूद अथवा व्यवस्था नसल्याने परिणाम त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक ऋतूत भाजीपाला कमी-जास्त दराने खरेदी करावा लागतो.

टोमॅटो – 100-120 रुपये/किलो
आले – 320 रुपये/किलो
घोसळी – 50 रुपये/किलो
भेंडी – 60 रुपये/किलो
कारले – 60 रुपये/किलो
भोपळा – 50 रुपये/किलो
फ्लॉवर – 60 रुपये/किलो
कोथिंबीर – 40-50 रुपये जुडी
बिट – 80-90 रुपये किलो

Exit mobile version