| महाड | प्रतिनिधी |
गेली काही दिवस सातत्याने वाढत असलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना, दुसरीकडे मात्र जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. दरदिवशी लागणार्या भाज्यांच्या दरातदेखील कमालीची वाढ झाली आहे. भाजीचे दर ऐकून सामान्य माणसाने डोक्याला हात लावला आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सद्यःस्थितीत पेट्रोलने शंभरी पार केली असल्याने या वाढत्या इंधन दराचा परिणाम सामान्य जनजीवनावर होत आहे. आधीच वाढलेली महागाई, वाढती बेरोजगारी याने हैराण असतनाच आता अचानक वाढत असलेल्या इंधन दरवाढीचा फटका सामान्य लोकांना बसत आहे. या इंधन दरवाढीने महाडमध्ये भाजीचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. घरात लागणार्या पालेभाज्या, फळभाजी घेणे कठीण बसले आहे. इंधन दर वाढीने ट्रान्सपोर्ट चे दर वाढले आहेत यामुळे बाहेरून येणार्या भाज्या खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात नसल्याचे दिसून येत आहे. महाडमध्ये वाई, पाचगणी, भोर, पुणे आधी ठिकाणहून भाज्या येत असतात. दोन्ही मार्गावर घाटरस्ता असल्याने वाहतूक खर्च अधिक असला तरी पालेभाज्या आणि फळभाज्या एवढ्या लांबून येऊनदेखील आवाक्यात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर प्रतिदिन वाढत असल्याचे चित्र दिसत आहेत.
महाडमध्ये सध्या भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने भाजी घेणे सामान्य माणसाला कठीण झाले आहे. महाडमध्ये पालेभाज्यांची एक जुडी किमान 30 ते 40 पर्यंत आहे. यामध्ये माठाची एक जुडी 40 रुपये, शेपूची भाजीदेखील 40, कांदा पात 25, टोमाटो 40 रुपये किलो, फरसबी जवळपास 200 रुपये किलो, भुईमुग 80 रुपये किलो तर मटार 240 रुपये किलो, सिमला मिरची 100 रुपये, गवार 100 रुपये किलो, मिरची 60 ते 80 रुपये किलो, तर मटार 200 किलो, शेवगा 300 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो, कांदे 80, कोथिंबीर 30 रुपये जुडी, पुदिना 30 रुपये जुडी असे दर ऐकण्यास मिळत आहेत. पालेभाजीबरोबर फळांचे दरदेखील तितक्याच प्रमाणात वाढले आहेत. कांद्यानेदेखील 60 पार करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे निवडणुकांचे प्रचार शिगेला पोहोचला असतानाच दुसरीकडे भाज्यांचे भाव कडाडले असल्याचे दिसून येत आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे बजेट कोसळले आहे.