खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो 20 ते 25 रूपयांनी वाढ; गृहिणींच्या घरखर्चाचे बजेट कोलमडले
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
गणेशोत्सव संपल्यानंतर काही दिवसांतच नवरात्र, दसरा आणि दिवाळी या मोठ्या सणांची चाहूल लागली आहे. सध्या बाजारात भाज्या, कडधान्यांचे भाव वाढलेले असून, सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या भाववाढीमध्ये आता खाद्यतेलांच्या किमतींनीही मोठी उसळी घेतली आहे, ज्यामुळे गृहिणींचे घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे.
केंद्र सरकारने रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल आणि इतर खाद्यतेलांवरील आयात शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ केल्याने खाद्यतेलांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोयाबीन, राइस ब्रॅन, वनस्पती, तूप आणि मोहरी तेल यांच्या भावात प्रतिकिलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या विळख्यात अडकलेल्या गृहिणींना आणखी अडचणीत टाकले आहे.
खाद्यतेलांच्या भाववाढीने महागाईची आग आणखी धगधगवली आहे. याचा फटका सण साजरे करणार्या सामान्य नागरिकांना बसणार असून, यामुळे येणार्या दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.सणांच्या तोंडावर वाढलेले भाव गणेशोत्सव साजरा करून गृहिणी काहीशा सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच दसरा, नवरात्र आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण उंबरठ्यावर आले आहेत. या सणांमध्ये तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशा परिस्थितीत तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे सण साजरे करणे सामान्य गृहिणींसाठी कठीण होणार आहे.
व्यावसायिकांनाही मोठा फटका
सोयाबीनचा 15 लीटर डबा, जो पूर्वी 1700 रुपयांना मिळत होता. आता 2100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तब्बल 400 रुपयांची वाढ झाल्यामुळे लहान हॉटेल, टपरी आणि खानावळ चालक यांनाही याचा मोठा फटका बसत आहे, ज्यामुळे पुढे आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.
महागाईमुळे जगणे कठीण
महागाईमुळे रस्त्यावरील खड्डे, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, भाज्या आणि कडधान्याचे वाढलेले भाव, आता खाद्यतेलाच्या भाववाढीने सामान्य लोकांचे जगणे अधिकच कठीण केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला आणि कडधान्य कडाडले होते, आता तेलही महागल्याने भाजीला महागाईची फोडणी द्यावी लागणार आहे. प्राथमिक गरजांचे जिन्नस महागल्यामुळे रोजंदारी करणारे शेतकरी आणि मजूर यांच्यावर मोठा आर्थिक ताण येत आहे. या वस्तू तरी स्वस्त होणे गरजेचे आहे.
रेशमा घरत,
गृहिणी
सध्या कडधान्याच्या भावांमध्ये मोठी वाढ झाली आहे, त्याचबरोबर खाद्यतेलाच्या किमतीतही प्रतिलीटर 15 ते 20 रुपये वाढ झाली असून, पंधरा किलोच्या डब्यांमध्ये 400 ते 450 रुपयांची वाढ झाली आहे. दिवसागणिक प्रत्येक गोष्ट महाग होत असल्याने व्यवसायावरही परिणाम होत असून, ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
राजेंद्र गावित,
व्यावसायिक
