नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
| उरण । वार्ताहर ।
मोरा ते मुंबई जलप्रवास विना अडथळा सुरू रहावा, यासाठी चार महिन्यांपूर्वी मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी चार कोटी खर्च आला होता. मात्र, बंदरात गाळाची समस्या कायम राहिल्याने मागील चार दिवसांपासून ठराविक कालावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वारंवार कोट्यावधींच्या खर्चानंतरही गाळाची समस्या कायम राहिल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मोरा बंदरातून भाऊचा धक्का येथुन मुंबईत पोहोचण्यासाठी अवघा एक तास लागतो. प्रदूषण, वाहतूक कोंडी आदी त्रासापासून दूर ठेवणारा अत्यंत जवळचा आणि फक्त 80 रुपयात मुंबईत पोहचवणारा स्वस्त अशी मोरा -भाऊचा धक्का सागरी मार्गाची ओळख आहे. मात्र, गाळामुळे ओहटीच्यावेळी वाहतूक बंद होण्याची सर्वात मोठी समस्या बंदरात आहे. बंदरात सातत्याने गाळ साचत असल्याने समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटी मोरा बंदरात गाळात रुतून बसतात. त्यामुळे प्रवाशांना घेऊन येणार्या प्रवासी बोटी बंदरापर्यत पोहचू शकत नाहीत.
परिणामी, दररोज कामासाठी मुंबईत जाणार्या हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यामुळे प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन बंदरातील गाळ काढण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.