पालीत वाहतूक कोंडीची समस्या जटिल

भाविक, पर्यटकांना गुगल मॅपचा चकवा; सूचना फलकांकडे दुर्लक्ष

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी तसेच पुढे तळ कोकणात जाण्यासाठी पर्यटक व भाविकांची रेलचेल सुरू असते. नववर्षात हजारोंच्या संख्येने भाविक, पर्यटक आणि त्यांची वाहने पाली शहरातून ये-जा करत आहेत. अनेकजण गुगल मॅप लावून आत येण्याचा व जाण्याचा रस्ता शोधत आहेत. मात्र, येथील नो इन्ट्रीच्या रस्त्याची गुगल मॅपला नोंदच नसल्याने अनेक वाहने नो इन्ट्रीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. शिवाय नागरिक, पर्यटक व भाविकांची गैरसोय सुद्धा होते. त्यामुळे पालीतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे.

पाली शहरातून पुढे विळे निजामपूर मार्गे माणगाव, महाड, श्रीवर्धन तसेच तळ कोकणात व पुण्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. तर, तिकडून येणारी वाहने पाली-खोपोली राज्य महामार्गारून पुणे-मुंबईकडे जातात. या सर्व वाहनांना पालीतील अंतर्गत रस्त्यावरूनच जावे लागते. पालीत प्रवेश करण्यासाठी स्टेट बँक येथून व बाहेर पडण्यासाठी महाकाली मंदिराजवळून विक्रम स्टॅन्ड मार्गे असे दोन मार्ग निर्धारित केले आहेत. या ठिकाणी प्रवेश बंद, तसेच आत व बाहेर पडण्याचे मोठे फलक देखील लावण्यात आले आहेत. अनेकजण मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करत आहेत. परंतु, गुगल मॅपवर प्रवेश बंद असल्याची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही वाहने प्रवेश बंद असलेल्या मार्गावरून जातात आणि अरुंद रस्तावर समोरून येणाऱ्या वाहनांमुळे त्यांना अडकून पडावे लागते. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.

बाह्यवळण मार्ग लालफितीत
वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गवर बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आखत्यारीत हा मार्ग होणार आहे. राज्यशासनाने सन 2010 या वर्षी या रस्त्याला मान्यता दिली आहे. तसेच, त्यावेळी रस्त्यास 18 कोटी तर भूसंपादनासाठी 10 कोटींची मंजुरी मिळाली होती. हा मार्ग वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548(ए) व पाली पाटणूस राज्यमार्ग 94 ला जोडला आहे. यासाठी बलाप, पाली, बुरुमाळी व झाप या गावातील एकूण 9 हेक्टर जागा लागणार आहे. मात्र, हा बाह्यवळण मार्ग लालफितीत अडकला आहे. येथील काही शेतकऱ्यांचा देखील या बाह्यवळण मार्गाला योग्य मोबदला न मिळाल्याने व शासन मागण्यांची पूर्तता करत नसल्याने विरोध आहे.
इतर वाहनांची रेलचेल
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबईवरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाववरून किंवा वाकणवरूण पुढे जातात. तर, कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरुन विळे मार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढून वाहतूक कोंडी अधिकाधिक जटिल होते. महाकाली मंदिराजवळील मार्गावर सिग्नल देखील लावण्यात आला आहे. परंतु, सद्यस्थितीत तो बंद असल्यामुळे कोंडीची समस्या उद्भवत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.

प्रवेश बंद असलेल्या रस्त्याची नोंद गुगल मॅपवर करावी, यासाठी संबधीत विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे. यासंदर्भात पाठपुरावा देखील करत आहोत. लवकरच त्यांच्यासोबत बैठक बोलावली आहे. रस्त्याच्या सुरुवातीलाच नो एंट्रीचे मोठे फलक लावण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. काही अतिक्रमण केलेली बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरण केले आहे. वाहन चालकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळावे व नो एन्ट्रीचे फलक पाहूनच मार्गक्रमण करावे.

– सुलतान बेनसेकर, उपनगराध्यक्ष, नगरपंचायत, पाली

येथील रस्ते अरुंद आहेत. शिवाय नो एंन्ट्रीमधुन जाणारी वाहने तापदायक ठरतात. त्यामुळे वाहने अडकून पडून वाहतूक कोंडी जटिल होते. लवकर या नो एंट्री मार्गाची गुगल मॅपवर नोंद करावी, जेणेकरून वाहने प्रवेश बंद असलेल्या रस्त्यावर प्रवेशच करणार नाहीत. आलेले प्रवासी पर्यटक व भाविक यांचे देखील गैरसोय होणार नाही.

– अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली

Exit mobile version