प्रांताच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
| खरोशी | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जिते गावातील सर्व्हिस रोडला पडलेलं खड्डे, गावातील गटारे, प्रवाशांसाठी बस शेड, महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेचे सीमांकन करणे, सर्व्हिस रोडवरील अवजड वाहतूक बंद करणे व अरुंद मोर्या मोठ्या करण्यासाठी ग्रामपंचायत जिते व ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल ईनामदार यांच्या मध्यस्थीने तूर्तास मागे घेण्यात आले आहे. संबंधित कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रांत कार्यालयात झालेल्या या मिटिंगसाठी जिते सरपंच अंजना विलास म्हात्रे, उपसरपंच ज्योती म्हात्रे, सदस्य प्रकाश म्हात्रे, ललिता पाटील, विशाल भोईर, रुपाली म्हात्रे, विजय म्हात्रे, बाळाशेठ म्हात्रे, नरेश म्हात्रे, विलास म्हात्रे, बळीराम म्हात्रे, दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सोपान रासकर नायब तहसिलदार कालेकर नॅशनल हायवेचे नागराजे रवींद्र मुंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिते ग्राम पंचायत व संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी 21 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचे ठरविले होते. परंतु पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांबरोबर तातडीची बैठक लावून येत्या आठ दिवसात सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्याने व संबंधित खात्याच्या अधिकार्यांना कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तर काही कामे सुरूही करण्यात आल्याने आम्ही तूर्तास आंदोलन मागे घेत असून, सर्व कामे पूर्ण न झाल्यास यापुढे पुन्हा जनआंदोलन करणार असल्याचे जिते ग्राम पंचायत सरपंच अंजना विलास म्हात्रे यांनी सांगितले.