गेट वेवरील कार्यक्रमाचा प्रवाशांना मन:स्ताप

वारंवार होणाऱ्या कार्यक्रमांमुळे पर्यटनस्थळ बंद

| सोगाव | वार्ताहर |

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व मुंबईची शान असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथे भारतातीलच नव्हे, तर देशविदेशातील पर्यटक दररोज हजारोंच्या संख्येने आवर्जून भेट देत असतात. मात्र, याठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा सर्वांनाच फटका बसत असतो. मुख्यत: मांडवा-अलिबाग, जेएनपीटी, एलिफंटा आदी ठिकाणी ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना या कार्यक्रमांचा अधिकतेने फटका बसत आहे.

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई महानगरपालिका यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या गेटवे ऑफ इंडिया या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी अनेक वेळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; परंतु याठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केल्याने पर्यटनस्थळ अचानक कोणतीही माहिती न देता बंद करण्यात येते. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळ पाहता येत नसल्यामुळे हिरमोड होतो. शिवाय, याच ठिकाणी जलप्रवासाने मांडवा-अलिबाग, जेएनपीटी, एलिफंटा याठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना व प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटी याच ठिकाणाहून जात असताना, याठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना व प्रवाशांना सर्वात आधी कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाहीच आणि सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पर्यटक व प्रवाशांना योग्यप्रकारे मार्गदर्शन न करता, याठिकाणी येण्यास मज्जाव करीत असतात. त्यामुळे मांडवा-अलिबाग व जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्वसामान्य रुग्ण, वयोवृद्ध, गरोदर माता, लहान मुलांच्या माता, नोकरदार अशा प्रवाशांना याचा फार मोठा मन:स्ताप होतो. तरी संबंधित प्रशासनाने पर्यटनस्थळा ठिकाणी अशा कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, दिल्यास तेथील पोलिसांकडून प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी, पर्यटक व प्रवासी करत आहेत.

Exit mobile version