शेती व्यवसायातून धरली प्रगतीची कास

शेतकर्‍याने फुलविला भाजीचा मळा
ताजी भाजीसाठी घाऊक व्यापार्‍यांकडून मागणी

। नेरळ । संतोष पेरणे ।

कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आपली ओळख निर्माण करणार्‍या विनय वेखंडे यांनी यावेळी कृषी पर्यटनाबरोबर आता भाजीपाला शेती व्यवसायाकडे आपली पावले वळवली आहेत. दरम्यान, ताजा आणि दररोज उपलब्ध होत असल्याने कर्जत शहरातील घाऊक भाजीपाला विक्रेते यांच्याकडून दररोज भाजीची उचल केली जात आहे. त्यामुळे विनय वेखंडे यांचा हा नवीन व्यवसाय चांगला आर्थिक नफा मिळवून देत आहे.
विनय वेखंडे यांनी वदप गावातील राजनाला कालवा परिसरातील शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे उत्पादन घेणारी शेती करीत आहेत. त्यांनी एक हेक्टरमध्ये भाताचे विक्रमी पीक घेतल्याबद्दल त्यांना राज्य पातळीवर पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. पाच एकर क्षेत्रात कांदा, फराजबी, भेंडी, टोमॅटो, काकडी, मिरची, कोबी आणि कलिंगडाचे उत्पादन घेण्यासाठी शेती केली आहे. या सर्व भाजीपाला शेतीतून मागील दहा दिवसांपासून उत्पादन मिळू लागले आहे. वेखंडे हा सर्व भाजीपाला आपल्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जत शहरात विक्रीसाठी नेण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, ताजा भाजीपाला मिळत असल्याने कर्जत शहरातील काही भाजीपाला विक्रेते यांच्याकडून दररोज मागणी असते . त्याचा परिणाम ताजी आणि गावठी भाजी विकत घेण्यासाठी सर्व व्यापारी यांच्याकडे ग्राहकांची गर्दी होत आहे.

Exit mobile version