। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव शहरात घरफोडीचे धाडसत्र सुरूच असून शहरातील जुने माणगाव परिसरातील महादेव स्टील बिल्डिंग मटेरियल दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम १५ हजार ३०० रुपये घेऊन तो फरार झाला आहे. सदरचा गुन्हा दि.२६ जून रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला असून याबाबतची फिर्याद रामजीलाल चतराजी माली (वय-४६) रा.विद्यानगर जुने माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याने फिर्यादी रामजीलाल चतराजी माली यांच्या मालकीचे महादेव स्टील बिल्डिंग मटेरिअलच्या दुकानाच्या गेटवरून आतमध्ये उडी मारून दुकानात प्रवेश करून काउंटरच्या गल्ल्याचे लॉक तेथे असलेल्या लोखंडी कैचीच्या साहाय्याने तोडून घरफोडी चोरी करून १५ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम लांबविली.या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.१८७/२०२२ भादवि संहिता कलम ३८०,४५७ प्रमाणे करण्यात येऊन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री .खिरीट हे करीत आहेत.