| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून रंगलेली प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी रात्री दहा वाजता अधिकृतपणे थांबली. सभा, बैठका, पदयात्रा, घरभेटी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि उमेदवार यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. प्रचार थांबताच आता सर्वांचे लक्ष शनिवारी, दि. 7 रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. मतमोजणी सोमवारी, दि. 9 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 59 गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या 118 गणांमध्ये उमेदवारीचे चित्र 27 जानेवारीला स्पष्ट झाले होते. या निवडणुकीत एकूण 502 उमेदवार रिंगणात असून, त्यात जिल्हा परिषदेचे 173 तर पंचायत समितीचे 329 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती रंगल्या असून, काही गट आणि गणांमध्ये बहुकोनी लढतीमुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी सभा-बैठका, प्रचारफेऱ्या, कोपरा सभा, पदयात्रा आणि प्रत्यक्ष भेटीगाठींच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. गावागावांत राजकीय चर्चांना उधाण आले होते. स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार अशा मुद्द्यांवर उमेदवारांनी आपापली भूमिका मांडत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, पत्रके, सोशल मीडियावरील प्रचार आणि घरपोच संपर्क मोहिमा यांना वेग आला होता. रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. मात्र, आचारसंहितेनुसार गुरुवारी रात्री दहा वाजताच प्रचार थांबल्याने राजकीय हालचालींना अचानक विराम मिळाला.
प्रचार थांबल्यानंतर निवडणूक यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ, मतदान साहित्य, बॅलेट मशिन्स आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अधिकाऱ्यांकडून सतत पाहणी केली जात आहे.
मतदारांनी कोणताही संभ्रम न बाळगता शांततेत मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच मतदारांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीला मोठे महत्त्व असल्याने मतदारांचा उत्साहही वाढलेला दिसून येत आहे. आता सर्वांचे लक्ष मतदारांच्या कौलाकडे लागले असून, कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवारांना मतदार पसंती देतात, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या पंधरा दिवसांचा प्रचार, उमेदवारांची प्रतिमा, स्थानिक प्रश्न आणि मतदारांशी साधलेला संपर्क याचा निकालावर किती परिणाम होतो, हे सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.







