पेट्रोल पंपाची संरक्षण भिंत कोसळली

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कळंब गावाजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे. रविवारी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या पंपाच्या उभारणीत बांधण्यात आलेली संरक्षण भिंतच कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे पंपाच्या एका कोपर्‍यात उभी असलेली काही वाहने थेट नाल्यात कोसळली आहेत.

कर्जत-मुरबाड महामार्गवर कळंब नाक्यापासून पुढे एक किलोमीटर अंतरावर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप असून काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आला होता. पंपाचे काम करताना मागील बाजूस नाला असल्याने भराव टाकून संरक्षक भींत बांधण्यात आली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस भुस्सखलन होऊन संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून तेथे उभी असणारी वाहने बाजुला वाहत असलेल्या नाल्याच्या पाण्यात कोसळल्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी येथील कामगारांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणाने हा पेट्रोल पंप काही वेळ बंद ठेवण्यात आला होता. या नुकसानीबद्दल महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी जात पंचनामा करून त्याच्या अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे.

Exit mobile version