प्रलंबित मागण्यांचा प्रश्न ऐरणीवर
| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील आरोग्य आणि दळणवळणाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (दि.19) धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आगामी निवडणुका आणि लागू झालेली आचारसंहिता लक्षात घेता, हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आंदोलनाचे नेतृत्व करणारे महेश पोंगडे यांनी गुरुवारी (दि.15) दिली आहे. तसेच, नवीन तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पाली येथील ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून ते सेवेत दाखल करावे आणि गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या पाली बसस्थानकाचे नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी सुधागडची जनता रस्त्यावर उतरणार होती. सत्यशोधक वारकरी संप्रदाय आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने हे धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले होते. भजन, कीर्तन आणि प्रबोधनात्मक पद्धतीने प्रशासनाचा निषेध नोंदवण्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु, नुकत्याच जाहिर झालेल्या निवडणुका आणि लागू झालेली आचारसंहिता लक्षात घेता, हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनाला तालुक्यातील आदिवासी पाड्यांपासून शहरापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकांमुळे सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाली पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने (तहसील कार्यालय) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलकांना हे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली होती. यावेळी महेश पोंगडे, तुकाराम ठोंबरे, भगवान दळवी, दीपक कदम, रोहित मिसाळ यांसह अनेक कार्यकर्त्यांनी जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले असून, पुढील लढ्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
नवी तारीख लवकरच
आंदोलन स्थगित झाले असले तरी जनतेचा निर्धार कायम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. महेश पोंगडे यांनी पत्रकाद्वारे सांगितले की, केवळ तारीख बदलली आहे, आमचा उद्देश आणि संघर्ष कायम आहे. 1 रुपया निधी देऊन या आंदोलनात सुधागडमधील सामाजिक संघटना, मान्यवर, वारकरी परिषद, विद्यार्थी, महिला आणि रिक्षा संघटनांनी मोठा पाठिंबा दिला आहे. आचारसंहितेचा कालावधी संपताच आंदोलनाची पुढची तारीख जाहीर केली जाईल.







