सुक्या म्हावर्‍याची चलती

मागील महिन्यापेक्षा आता स्वस्त; अगोटीसाठी खरेदीची लगबग

। सुधागड-पाली। वार्ताहर ।

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुढील महिना (दि.1) जून पासून दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते. पावसाळ्यातील बेगमीसाठी सुकी मासळी हक्काची जिन्नस आहे. आणि मग यावेळी मांसाहारी खाणा-यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळेच या दिवसांत सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरु आहे. मागील महिन्याच्या तुलनेत आता सुक्या मासळीचे भाव किलो मागे 50 ते 100 रुपयांनी कमी झाले आहेत. परिणामी खवय्ये सुकी मासळी खरेदीची घाई करत आहेत.

सध्या जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल सुरु आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात भाजीपाला व मासळी यांची आवक कमी होते. आणि त्यांचे भाव देखील वधारतात अशा वेळी घरात साठवुन ठेवलेली सुकी मासळी काढली की मग जेवण चांगले जाते. मागील वर्षभरात समुद्रात अगदी कमी प्रमाणात मासळी सापडत आहे. सापडलेली मासळी ताजी विकण्यावर मच्छिमारांचा कल असतो. मासळी आधीच कमी मग सुकविण्यासाठी कुठून उरणार त्यामुळे मासळी फार कमी जण सुकवितात. मात्र तरीही हे सुकी मासळी पुरेशी असल्याने जिल्ह्यासह पुणे मुंबई या शहरातील पर्यटक व नागरिक आवर्जून येथून खरेदी करून घेऊन जातात. तर काहीजण भेट म्हणून देखील देतात.

फिरत्या सुक्या मासळी विक्रेत्या 
गावागावांत डोक्यावर टोपलीत सुकी मासळी घेवून विक्रीसाठी फिरणार्या विक्रेत्या दिसत आहेत. या मासळी विक्रेत्यांकडून अनेक लोक परवडणार्‍या किंमतीमध्ये सुकी मासळी आपल्या दारा समोरच सुकी मासळी खरेदी करतात.   
पेडली सुक्या मासळीचे हब
पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली या गावी सुकी मासळी विक्रेते केंद्रित झाले आहेत. सध्या या ठिकाणी सुक्या मासळीची सात दुकाने आहेत. त्याचबरोबर या मार्गावर चीवे येथे देखील सुकी मासळी विक्रेते बसतात. त्यामुळे पुणे व मुंबई कडे जाणारे प्रवासी व पर्यटक आवर्जून या ठिकाणी थांबून चांगल्या दर्जाची सुकी मासळी खरेदी करतात. त्यामुळे पेडली हे सुक्या मासळीचे हब झाले आहे. इतर ठिकाणी मिळणार्‍या मासोळी पेक्षा या ठिकाणी मुबलक विविध दर्जाची मासळी मिळते तेही योग्य दारात.



सुकी मासळीचे भाव प्रतिकिलो

1साधे सोडेआत्ता 1200 ते 1400 रुपये मागील महिन्यात 1500 रुपये
2उच्च दर्जाचे सोडेआत्ता 1600 ते 1800 रुपये मागील महिन्यात 2000 ते 2200 रुपये.
3बांगडा20 व 25 रुपये 1 नग मागील महिन्यात सारखीच किंमत.
4अंबाडीआत्ता 400 व 500 रुपये. मागील महिन्यात सारखीच किंमत
5सुका जवलाआत्ता दर्जानुसार 200, 250 व 300 रुपये किलो. मागील महिन्यात 350 व 400 रुपये किलो
6मोठे बोंबीलआत्ता चांगल्या दर्जाचे 400 व 500 रुपये. मागील महिन्यात 500 व 600 रुपये
7छोटे बोंबीलआत्ता 400 रुपये. मागील महिन्यात 500 रुपये
8साधी सुकटआत्ता 150 व 200 रुपये. मागील महिन्यात 200 व 250 रुपये
9माकुलआत्ता 600 रुपये किलो. मागील महिन्यात 650
10पांढरी मोठी वाकटीआत्ता साधी 400 चांगली 600 रुपये किलो. मागील महिन्यात साधी 500 चांगली 650
11छोटी वाकटीआत्ता 200 व 250 रुपये. मागील महिन्यात 250 व 300 रुपये किलो
12मांदेलीआत्ता 200 रुपये. मागील महिन्यात 250 रुपये किलो.
13मासे सुकट (खारे)आत्ता व मागील महिन्यात दर्जानुसार 400, 500 व 600 रुपये
14रेपटीआत्ता 350 रुपये. मागील महिन्यात 400 रुपये
15सुरमईआत्ता व मागील महिन्यात 600 रुपये

मागील महिन्याच्या तुलनेत आता सुक्या मासळीचे भाव कमी झाले आहेत. पावसाळ्यातील बेगमीसाठी खवय्ये आवर्जून सुकी मासळी खरेदी करतात. पुणे मुंबई कडे जाणारे प्रवासी व पर्यटक तसेच स्थानिक नागरिक ही खरेदी करतात. किमती कमी झाल्यामुळे अधिक खरेदी करत आहेत. ग्राहकांना उत्तम दर्जाची सुकी मासळी योग्य दरात पुरवतो.

सुनील सावंत,
सुकी मासळी विक्रेता,
पेडली

पावसाळ्यात खाण्यासाठी सुकी मासळी साठवून ठेवते. त्यामुळे दर वर्षी या दिवसांत सुकी मासळी खरेदी करते. घरच्या मंडळींना जेवणात मासे मटण नसले तर सुकी मासळी आवर्जुन लागते. त्यामूळे सुकी मासळी खरेदी केली आहे. पेडली येथे चांगल्या दर्जाची सुखी मासळी मिळते.

छाया म्हात्रे,
गृहिणी,
पाली
Exit mobile version