उरण | वार्ताहर |
नवी मुंबई महानगरपालिकेने गरजेपोटी बांधलेल्या 450 घरांना मालमत्ता कराच्या तीनपट मालमत्ता कर भरण्याचा फतवा काढल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महानगरपालिकेने गावठाण क्षेत्रातील गरजेपोटी बांधलेल्या 450 घरांना पाठवलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या नोटीसंप्रामणे मालमत्ता कर सक्तीने वसूल करू नये, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने गावठाण क्षेत्रातील गरजेपोटी बांधलेल्या 450 घरांना मालमत्ता कराच्या तीनपट कर भार्णयाबाबतच्या नोटीस पाठवल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 पर्यंतची घरे नियमित करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकार ही घरे नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
त्यामुळे गरजेपोटी बांधलेल्या 450 घरांकडून मालमत्ता कराची वसुली सक्तीने करणे चुकीचे आहे. नवी मुंबई शहर बसविण्यासाठी येथील भूमिपुत्र ग्रामस्थांनी त्यांच्या शंभर टक्के जमिनी शासनाला दिल्या आहेत. 2015 पर्यंतची घरे नियमित करण्याचा निर्णय शासन दरबारी प्रलंबित असून जोपर्यंत त्याबाबत सरकार अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत वाढीव घरांकडून मालमत्ताकराची सक्तीने वसुली करू नये, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली.